एपीएमसीच्या कार्यालयात टाकले डेब्रिज, माथाडींचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 06:49 AM2018-01-03T06:49:47+5:302018-01-03T06:50:00+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य मार्केटमध्ये पाच वर्षांपासून रोडचे काम रखडले आहे. यामुळे संतापलेल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करून अधिकाºयांच्या दालनात डेब्रिज टाकले.
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या धान्य मार्केटमध्ये पाच वर्षांपासून रोडचे काम रखडले आहे. यामुळे संतापलेल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करून अधिकाºयांच्या दालनात डेब्रिज टाकले. कामे मार्गी लावली नाहीत, तर आंदोलन तीव्र करून मंत्र्यांच्या दालनात खडी टाकण्याचा इशारा दिला आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाºया मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील विकासकामे ठप्प आहेत. पाच वर्षांपूर्वीच संचालक मंडळाची मुदत संपली आहे. नवीन संचालक मंडळाची नियुक्ती केली जात नाही. शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यावर उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. यामुळे बाजारसमितीमधील अनेक कामे रखडली असून, त्यामध्ये दाणाबंदरमधील रोडच्या कामाचाही समावेश आहे. रोडचे काम अर्धवट राहिले आहे. ठेकेदाराने काम करण्यास नकार दिला असून, त्याचा फटका वाहतूकदार, कामगार व ग्राहकांना होत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन रखडलेले काम पूर्ण करत नाही. परिणामी, दिवसेंदिवस गैरसोयी वाढत आहेत. शासन व प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे माथाडीनेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी मंगळवारी धान्य मार्केटमध्ये आंदोलन केले.
संतप्त कामगारांनी रोडवरील खडी गोणीमध्ये भरून उपसचिवांच्या टेबलवर टाकली. कामगार, व्यापारी, ग्राहक, वाहतूकदार अनेक वर्षांपासून त्रास सहन करत आहेत; परंतु प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. मार्केटमधील समस्यांची प्रशासनाला जाणीव व्हावी, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नरेंद्र पाटील यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. रखडलेली कामे पूर्ण केली नाहीत, तर ४ जानेवारीला एपीएमसीच्या मुख्य कार्यालयामध्ये खडी टाकली जाईल. यानंतरही कामे झाली नाहीत, तर पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या दालनामध्ये रोडवरील खडी टाकण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. या वेळी नरेंद्र पाटील यांच्यासह रविकांत पाटील, साहेबराव नांगरे, अशोक दुधाणे व इतर उपस्थित होते.
धान्य मार्केटमधील रोडचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलन करण्यात आले. या विषयी ठोस कार्यवाही झाली नाही, तर एपीएमसी मुख्यालयात व नंतर पणनमंत्र्यांच्या दालनात खडी टाकून निषेध केला जाईल.
- नरेंद्र पाटील, माथाडीनेते
कामावर होत आहे परिणाम
रोडच्या रखडलेल्या कामाचा मार्केटमधील व्यवहारावर परिणाम होऊ लागला आहे. सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरत आहे. धुळीमुळे कामगार, व्यापारी व इतर घटकांना श्वसनाचे अजार होऊ लागले आहेत. वारंवार वाहतूककोंडी होत आहे. प्रचंड गैरसोय होत आहे. किती वर्ष हा त्रास सहन करायचा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मलनि:सारण वाहिन्याही खराब झाल्या आहेत. प्रसाधनगृहांमध्ये पाणी नाही व इतर अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.