वाशीत खारफुटीमध्ये डेब्रिजचा भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:42 AM2018-08-20T04:42:08+5:302018-08-20T04:42:26+5:30
भरदिवसा ठिकाणी डेब्रिज टाकले जात असल्याने पालिकेची झीरो डेब्रिज संकल्पना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गालगत वाशी गाव येथे मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव टाकला जात आहे. यामुळे खारफुटीची हानी होत असून, सौंदर्यीकरणातही बाधा निर्माण झाली आहे. मात्र, भरदिवसा त्या ठिकाणी डेब्रिज टाकले जात असल्याने पालिकेची झीरो डेब्रिज संकल्पना कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.
पालिकेची झीरो डेब्रिज संकल्पना अद्यापही कागदावरच आहे. रस्त्यावर अथवा मोकळ्या मैदानात डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाईसाठी भरारी पथक देखील तयार करण्यात आले होते. त्यांनाही डेब्रिजमाफियांवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलेले आहे. यामुळे शहरात जागोजागी, रस्त्यालगत डेब्रिजचे ढीग साचल्याचे पाहायला मिळत आहे. तर नजरेसमोर त्याठिकाणी डेब्रिज टाकले जात असतानाही पालिका अधिकाºयांकडून कारवाईला चालढकल होत आहे. यामुळे घणसोलीतील पाम बीच मार्गासह सायन-पनवेल मार्गालगत डेब्रिजचे ढीग साचल्याचे पाहायला मिळत आहे.
डेब्रिजमाफियांकडून सुरू असलेल्या या प्रकारामुळे तिथल्या खारफुटीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. रस्त्यालगत साचलेल्या डेब्रिजच्या ढिगाºयांमुळे परिसराच्या सौंदर्यीकरणात बाधा निर्माण होत आहे. एकीकडे नवी मुंबई महापालिकेवर विविध प्रकारच्या पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. राहण्यास उत्तम शहरांमध्ये नवी मुंबईचा उल्लेख देशात दुसरा झालेला आहे. यामुळे इतर शहरवासीयांच्या नजरा नवी मुंबईकडे लागलेल्या आहेत.
अशात शहराच्या प्रवेशद्वारावरच साचलेले डेब्रिजचे हे ढीग शहराची प्रतिमा मलिन करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अधिकाºयांच्या नाकर्तेपणामुळे डेब्रिजमाफियांवर कारवाईस होत असलेल्या चालढकलीचा संताप पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.