खेळाच्या मैदानात डेब्रिजचा भराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:19 PM2019-09-23T23:19:48+5:302019-09-23T23:19:55+5:30
कोपरखैरणेतला प्रकार; संबंधितांवर कारवाईत पालिकेची चालढकल
नवी मुंबई : खेळाच्या मैदानात डेब्रिजचा भराव टाकल्याचा प्रकार कोपरखैरणेत घडला आहे. गणेशोत्सवादरम्यान मैदानात चिखल होऊ नये याकरिता हा प्रकार करण्यात आला होता. मात्र खेळाच्या मैदानामध्ये रेती, खडी अथवा डेब्रिज टाकण्याची बंदी असतानाही त्या ठिकाणी झालेल्या प्रकाराकडे पालिकेची डोळेझाक होताना दिसत आहे.
पालिकेच्या वतीने शहरात प्रत्येक नोडनिहाय खेळाची मैदाने राखीव ठेवण्यात आली आहेत. त्या ठिकाणी परिसरातील मुले खेळत असल्याने त्यांना दुखापत होऊ नये, या उद्देशाने मैदानात डेब्रिज, खडी अथवा वाळू टाकण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तर खेळाची मैदाने सण, उत्सव किंवा सभांना भाड्याने देताना संबंधितांना तशी सूचनादेखील केली जाते. मात्र यानंतरही कोपरखैरणे सेक्टर ४ ते ८ च्या मध्यभागी असलेल्या मैदानात मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव टाकण्यात आलेला आहे. परिणामी सध्या या मैदानातून चालणे देखील कठीण झाले आहे. तर परिसरातील मुलांच्या खेळाचीदेखील गैरसोय झाली आहे. तर मैदानात टाकलेल्या भरावाचा फायदा त्या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी घेतला जाऊ लागला आहे.
कोपरखैरणे सेक्टर ४ ते ८ च्या दरम्यानचे एकमेव मोठे मैदान असून ते खेळांसाठी तसेच उत्सव साजरे करण्यासाठी देखील वापरले जाते. अशात मैदानात टाकण्यात आलेला डेब्रिजचा भराव नियमबाह्य आहे. पालिका अधिकारी कारवाईकडे दुर्लक्ष करून मैदानातील खेळ व नवरात्रौत्सव आयोजनात जाणीवपूर्वक बाधा निर्माण करत आहेत.
- रॉबिन मढवी, सामाजिक कार्यकर्ते