नवी मुंबई : शहर स्वच्छतेसाठी दिवस-रात्र धावपळ करणा-या महापालिका प्रशासनाचे मनपा मुख्यालयातील डेब्रिजच्या ढिगा-याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. अनेक महिन्यांपासून डेब्रिज इमारतीच्या बाहेर पडले असून ते उचलले जात नसल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियानामध्ये आघाडी घेतली आहे. माझा कचरा माझी जबाबदारी, माझे शहर माझा अभिमान ही घोषवाक्ये घेवून शहरभर जनजागृती सुरू केली आहे. शहरात कुठेही कचºयाचे ढिगारे, डेब्रिज दिसले तर स्वच्छता अॅपवर फोटो पाठवा, चोवीस तासामध्ये कचरा साफ केला जाईल, असे आश्वासन महापालिकेचे अधिकारी देत आहेत. नागरिकांनी दिलेल्या तक्रारींची गांभीर्याने दखलही घेतली जात आहे. स्वच्छता अभियानासाठी अधिकारी व कर्मचाºयांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारीही कर्मचाºयांना काम करावे लागत आहे. शहरभर अभियान प्रभावीपणे राबविणाºया प्रशासनाचे मुख्यालयातील कचºयाकडे दुर्लक्ष होवू लागले आहे. कँटीनच्या बाहेरील बाजूला अनेक महिन्यांपासून डेब्रिजचा ढिगारा पडला आहे. पालिका अधिकारी व कर्मचारी रोज येथून ये - जा करत असूनही हा कचरा उचलण्याकडे लक्ष दिले जात नाही. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. व सर्व अधिकारी शहरातील रेल्वे स्टेशन, बस डेपो, प्रत्येक विभागात स्वच्छतेच्या कामाची पाहणी करत फिरत आहेत. परंतु अधिकाºयांना मुख्यालय परिसराचा दौरा करण्यास अधिकाºयांना वेळ नाही असे चित्र निर्माण झाले आहे. डेब्रिज कधी उचलले जाणार, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील मोठा भाग अद्याप विकसित करण्यात आलेला नाही. या माळ्यावर जमिनीवर लादीही टाकण्यात आलेली नाही. त्या ठिकाणी साहित्य अस्ताव्यस्त पडले असल्याचे चित्र आहे. विविध विभागांमध्ये कोपºयामध्ये कुठेही फाईलचे गठ्ठे ठेवण्यात आले आहेत. मुख्यालयामध्ये साफसफाई चांगली होत असली तरी डेब्रिज व इतर कचरा कधी हटविला जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महानगरपालिकेचे विभाग कार्यालय, रुग्णालय व शाळांच्या इमारतींमध्ये अनावश्यक साहित्य मोठ्या प्रमाणात पडले आहे. काही इमारतींच्या बाहेरील ठिकाणी भंगार गोडाऊनचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यामुळे शहर स्वच्छतेला बाधा येऊ लागली आहे. नागरिकांना स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करताना प्रशासनाने स्वत:च्या इमारती व परिसर प्रथम स्वच्छ ठेवावा, असे आवाहन शहरातील दक्ष नागरिकांनी केले आहे.हाताची सफाईमनपा मुख्यालयाच्या प्रसाधनगृहामध्ये हात धुण्यासाठी डेटॉलचे हँडवॉश ठेवण्यात आले आहेत. प्रत्यक्षात बॉटल डेटॉलच्या असून आतमधील लिक्वीड सोप दुसºयाच कंपनीचा आहे. त्याचा दर्जाही चांगला नसल्याच्या तक्रारी नागरिक करू लागले असून याची चौकशी करण्याचीही मागणी होत आहे.
स्वच्छ भारत अभियानास हरताळ, महापालिकेच्या आवारातच डेब्रिजचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 2:50 AM