पाम बीचलगतच्या कांदळवन क्षेत्रात डेब्रिजचे भराव
By कमलाकर कांबळे | Published: April 14, 2024 08:27 PM2024-04-14T20:27:11+5:302024-04-14T20:27:19+5:30
पर्यावरणप्रेमींचा संताप : खारफुटी कक्षाच्या पथकाने केली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पामबीच मार्गावरील बॅरिकेड्स तोडून लगतच्या खारफुटीवर डेब्रिज टाकण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. विशेष म्हणजे सीवूड्स येथील चाणक्य तलावाचे अस्तित्वसुद्धा धोक्यात आले आहे. या परिसरात दिवसाढवळ्या डेब्रिजच्या गाड्या रिकाम्या केल्या जात असल्याने संबंधित विभागाच्या सुस्त आणि उदासीन कारभाराविषयी पर्यावरणवाद्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात वाढत्या तक्रारीची दखल घेत खारफुटी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.
नवी मुंबई सीवूड्स येथील चाणक्य तलाव संरक्षित करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सिडको आणि महापालिकेला दिले आहेत. त्यासाठी तलावाभोवती कुंपण घालण्याचे आदेश दिले आहेत. संबंधित विभागाकडून त्याकडे सोयिस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. विशेष म्हणजे पामबीच मार्गालगतचे बॅरिकेड्स तोडण्यात आले आहेत. त्यामुळे डेब्रिजने भरलेले डम्पर आत जाणे सोपे झाले आहे. चाणक्य तलाव आणि त्याच्या आजूबाजूचे खारफुटीचे क्षेत्र सिडकोच्या आधिपत्याखाली येते. या परिसरातील सुमारे ३२ हेक्टर क्षेत्र बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन तेथील तलाव बुजवून त्या ठिकाणी टोलेजंग इमारती बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. याविरोधात निसर्गप्रेमींनी मागील चार महिन्यांपासून साप्ताहिक आंदोलन छेडले आहे. विशेष म्हणजे सिडकोने आपल्या ताब्यातील सर्व खारफुटी प्रदेश वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र सिडकोच्या संबंधित विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला जात आहे. यातच चाणक्य तलावासह पामबीच मार्गालगतचे खारफुटी क्षेत्रसुद्धा डेब्रिजमाफियांचे भक्ष्यस्थानी आले आहे.
संबंधित विभागाच्या अर्थपूर्ण चुप्पीमुळे कांदळवन क्षेत्राचा ऱ्हास केला जात आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारींची दखल घेऊन खारफुटी तक्रार निवारण समितीने गेल्या महिन्यात मॅग्रोज सुरक्षा ॲप तयार केला आहे. या ॲपवर प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत खारफुटी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात या परिसराला भेट देऊन पाहणी केली. असे असले तरी या पाहणीचा निष्कर्ष काय, खारफुटी आणि कांदळवन क्षेत्राच्या संरक्षणासाठी ठोस कार्यवाही करणार का, असा सवाल आता निसर्गप्रेमींनी उपस्थित केला आहे.