नवी मुंबई : नवी मुंबई शहराच्या संरक्षक कवच मानल्या जाणाऱ्या नेरुळ आणि सीवूड भागातील खारफुटी क्षेत्रात डेब्रिजमाफियांच्या माध्यमातून डेब्रिज टाकले जात आहे. त्यामुळे खारफुटीच्या सरक्षांचा मुद्दा ऐरणीवर आला असून, महापालिकेच्या डेब्रिज भरारी पथकाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.
नवी मुंबई शहरात वाहने पार्किंग बरोबर डेब्रिज एक मोठी समस्या बनली आहे. शहरातील मोकळे भूखंड, नागरिकांची वर्दळ कमी असलेल्या परिसरात डेब्रिज माफियांनी डेब्रिजचे ढिगारे टाकले आहेत. नेरु ळ सेक्टर ४ येथील वनविभागाच्या हद्दीमध्ये असलेल्या खारफुटीवरही डेब्रिज टाकण्यात आले होते, त्यानंतर या ठिकाणी संरक्षक जाळी बसविण्यात आली आहेत; परंतु शहरातील अनेक ठिकाणच्या होल्डिंग पॉण्ड आणि खाडीकिनारीही डेब्रिज टाकले जात आहे.
शहरात टाकण्यात येणाºया डेब्रिजवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने डेब्रिज भरारी पथकाची निर्मिती केली, परंतु डेब्रिजमाफियांवर कोणताही वचक आलेला नसून डेब्रिजमाफिया खारफुटी क्षेत्रातदेखील डेब्रिज टाकत आहेत. खारफुटी परिसरातील डेब्रिज महापालिकेने उचलावे आणि अशा परिसरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत.