मोकळ्या भूखंडांवर डेब्रिज, कचऱ्याचे ढीग; नवी मुंबईत ठिकठिकाणी अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 11:34 PM2020-10-04T23:34:44+5:302020-10-04T23:34:49+5:30

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, डेब्रिज माफियांमुळे स्वच्छतेचे तीनतेरा

Debris on vacant plots, piles of rubbish; Difficulties in Navi Mumbai | मोकळ्या भूखंडांवर डेब्रिज, कचऱ्याचे ढीग; नवी मुंबईत ठिकठिकाणी अडचणी

मोकळ्या भूखंडांवर डेब्रिज, कचऱ्याचे ढीग; नवी मुंबईत ठिकठिकाणी अडचणी

Next

नवी मुंबई : नेरुळ विभागात डेब्रिजची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत असून, विभागातील अनेक ठिकाणच्या पदपथांवर डेब्रिज, कचरा आणि झाडांच्या सुकलेल्या फांद्या पडलेल्या आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेब्रिज माफियांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.

स्वच्छतेत बाजी मारल्यावर शहरातील स्वच्छतेच्या कामाकडे महापालिका प्रशासनाला विसर पडला आहे. नेरुळ विभागात स्वच्छतेच्या अनेक समस्या उद्भवत आहे. कोरोनाच्या संकटामुळे या वर्षी नवी मुंबई शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती. शहरातील मोठ्या धोकादायक झाडांची छाटणीची कामे न झाल्याने, या वर्षी सर्वाधिक झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. झाडे कोसळल्यावर महापालिकेच्या माध्यमातून झाडांची छाटणी करून वाहतुकीसाठी रस्ते खुले केले, परंतु अनेक ठिकाणी पदपथावरील झाडांच्या फांद्या उचलण्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे.

शहरातील मोकळे भूखंडांवर डेब्रिज माफियांकडून रात्रीच्या वेळी बेकायदेशीररीत्या डेब्रिज टाकले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी सिडकोच्या मोकळ्या भूखंडांना संरक्षक जाळी, भिंती बांधण्यात आल्या आहेत. परंतु डेब्रिज माफिया पदपथांवर डेब्रिज टाकत आहेत.
नेरुळ विभाग कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कडेला डेब्रिज टाकले जात असून, याकडेही महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन पदपथावरील कचरा आणि डेब्रिज हटविण्याची मागणी नागरिक करीत आहेत

घणसोली पामबीचवर डेब्रिजचा भराव
नवी मुंबई : घणसोली येथील पामबीच मार्गालगत डेब्रिजचा भराव टाकण्याचे काम भरदिवसा सुरू आहे. उघडपणे सुरू असलेल्या या कृत्याकडे प्रशासनाची डोळेझाक होताना दिसत आहे. परिणामी, जागोजागी डेब्रिजचे डोंगर तयार होत लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घणसोली येथून प्रस्तावित विक्रोळी पूल व ऐरोलीला जोडणारा मार्गासाठी खाडीलगत पामबीच मार्ग बनविला आहे.

मात्र, विक्रोळीला जोडणारा खाडीपूल व ऐरोलीला जोडणारा खारफुटीतला पूल अद्यापही कागदावरच आहे. परिणामी, घणसोलीचा पामबीच मार्ग सुविधांच्या बाबतीत दुर्लक्षितच आहे. याचा फायदा माफिया, बांधकाम व्यावसायिकांकडून घेतला जात आहे. गोण्यांमधून भरून आणलेले डेब्रिज मार्गालगतच्या झाडीत टाकले जात आहे. याकरिता मालवाहतूक करणाºया वाहनांचा वापर केला जात आहे. उघडपणे रस्त्यावर ही वाहने उभी करून, त्यामधील डेब्रिज त्या ठिकाणी फेकले जात आहे, तर काही ठिकाणी मोकळ्या जागेवर डेब्रिजचे डोंगर उभे राहत आहेत.

परिणामी, तिथून ये-जा करणाºया नागरिकांनी अशा ठिकाणांना कचराकुंडीचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे विभागाच्या सौंदर्याला बाधा येत आहे. काही महिन्यांपूर्वीच या मार्गाच्या सुशोभीकरणावर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. नवे पथदिवे बसवण्यात आले आहेत. मात्र, रस्त्याच्या दुसºया बाजूला डेब्रिजचे दिसणारे ढीग सुशोभीकरणाच्या शोभा घालवत आहेत. यामुळे त्या ठिकाणी डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करून संपूर्ण परिसराच्या स्वच्छतेचा खर्च वसूल करण्याची मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.

नेरुळमधील मैदानांची दुरवस्था
नवी मुंबई : नेरुळमधील खेळाच्या मैदानात मोठ्या प्रमाणावर गावात वाढले असून, कचरा साचला आहे. महापालिकेच्या माध्यमातून मैदानांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मैदानांची दुरवस्था झाली असून, परिसरालाही बकाल रूप आले आहे. महापालिकेने मैदानांची स्वच्छता करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

नियोजनबद्ध शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांसाठी आकर्षक उद्यानांची निर्मिती करण्यात आली असून, अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरात खेळाडू घडावेत, यासाठी सिडकोच्या माध्यमातून महापालिकेकडे मैदानांसाठी काही भूखंड हस्तांतरित झाले असून, महापालिकेने अनेक मैदानांवर सपाटीकरण, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था अशी अनेक कामे केली आहेत.

कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या काही महिन्यांपासून मैदानांच्या स्वच्छतेची कामे झालेली नाहीत, त्यामुळे मैदानांमध्ये गवताचे साम्राज्य पसरले असून, कचराही साचला आहे. त्यामुळे मैदानांना बकाल रूप प्राप्त झाले असून, खेळाडूंना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरातील महापालिका शाळांच्या मैदानांमध्येही गवत वाढले असून, अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे परिसरातील खेळाडूंना मैदानांचा वापर करता येत नाही. महापालिकेने या मैदानांमध्ये स्वछता मोहीम राबविण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Debris on vacant plots, piles of rubbish; Difficulties in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.