नवी मुंबई : सहा कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने बंगळुरूच्या व्यावसायिकाला सुमारे १३ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी नवी मुंबईसह पुणे व बंगळुरू येथे बैठका घेऊन सर्व्हिस चार्जच्या नावाखाली रक्कम उकळून कर्ज न देता फसवणूक केली आहे.
गोविंद राज एम. असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव असून ते मूळचे बंगळुरूचे आहेत. त्यांना व्यवसायाच्या वाढीसाठी सहा कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. याकरिता त्यांनी नागपूरच्या मित्राकडे चौकशी केली असता, त्याने वाशीतील मित्राशी संपर्क करून दिला होता. त्यानंतर सदर मित्राने वाशीतील स्टज सोल्युशन व फायनान्स कन्सल्टंट कंपनीचा संदर्भ दिला होता. यानुसार गोविंद हे वाशीत येऊन सदर कार्यालयात बैठक करून गेले होते. त्यानंतर तारण मालमत्तेच्या पाहणीच्या बहाण्याने तसेच सर्व्हिसच्या बहाण्याने त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेण्यात आले. तर पुणे येथे मुख्य फायनान्सर सोबत झालेल्या बैठकीत त्यांना कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्याकरिता सात लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कमही त्यांना दिल्यानंतर कराराच्या नावाखाली दिवस ढकलण्याचे काम संबंधितांकडून सुरू होते. यामुळे गोविंद यांनी पाठपुरावा वाढवला असता, त्यांच्यासोबतचा संपर्क तोडण्यात आला. यावरून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अभिषेक तिवारी, मेघना जोशी व जे. पी. सिंग यांच्याविरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनी बनावट नावाने हा कट रचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून यामध्ये सराईत गुन्हेगारांचे रॅकेट सक्रिय असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. मात्र, गोविंद राज एम. यांची १२ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.