लग्नाच्या आमिषाने फसवणाऱ्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2015 11:38 PM2015-08-19T23:38:22+5:302015-08-19T23:38:22+5:30
तरुणीसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवरून तरुणीसोबत ओळख वाढवली होती.
नवी मुंबई : तरुणीसोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून फसवणाऱ्याला कोपरखैरणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवरून तरुणीसोबत ओळख वाढवली होती.
रुपेश यशवंतराव (३४) असे त्याचे नाव आहे. त्याने कोपरखैरणेतील एका तरुणीची लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. या तरुणीने एका मॅट्रिमोनियल साइटवर नोंदणी केली होती. राजेश देशमुख उर्फ अब्दुल शेख याने तिच्यासोबत ओळख वाढवली होती. फेसबुकद्वारे त्याने या तरुणीसोबत ओळख केलेली. त्यानंतर दोघांची भेट झाली असता राजेश याने तिच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त केलेली.
मात्र यानंतर तो विविध कारणाने तिच्याकडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला होता. तरुणीने कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु केवळ फेसबुकवरील बनावट अकाऊंटवरून त्याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते.
या भामट्याचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक संभाजी कटारे, अशोक पवार व इतर कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी कसून तपास करून या भामट्याला अटक केली आहे. चौकशीत त्याचे खरे नाव रुपेश यशवंतराव असल्याचे समोर आले. रुपेश हा डोंबिवलीचा असून मूळचा मुरबाडचा आहे. त्याच्याकडून लुटीचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने व ४० हजार रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. (प्रतिनिधी)