१५ डिसेंबरपासून दंडाच्या रकमेवर मिळणार ७५ टक्के सूट; पालिकेचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 01:19 AM2020-12-14T01:19:21+5:302020-12-14T01:19:28+5:30
मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना
नवी मुंबई : मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महापालिकेने अभय योजना सुरू केली आहे. १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी २0२१ या दोन महिन्यांच्या कालावधीत थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना त्यांच्या दंडाच्या रकमेत ७५ टक्के सूट दिली जाणार आहे.
कोविडकाळात सर्वसामान्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यामुळे अनेकांनी कराचा भरणा केलेला नाही. अशा मालमत्ताधारकांना ही योजना दिलासा देणारी असल्याचे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले आहे.
मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. कररूपाने जमा होणाऱ्या निधीतून महापालिका विविध सुविधांची पूर्तता करते. परंतु कोविडमुळे महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर थकीत मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी महापालिकेने अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ डिसेंबरपासून या योजनेला प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी आपल्या मालमत्ता कराची थकीत रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरणा केल्यास दंडात्मक रकमेत त्यांना ७५ टक्के सूट दिली जाणार आहे. दरम्यान, या अभय योजनेस कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मालमत्ता कराची थकीत रक्कम व ७५ टक्के सवलत वगळून उर्वरित २५ टक्के दंडात्मक रक्कम एकाच वेळी भरावयाची आहे. टप्प्याटप्प्याने भरणा केलेल्या रकमेस अभय योजना लागू राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले.
ऑनलाइन सुविधा
योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच सर्व ८ विभाग कार्यालये आणि कर भरणा केंद्रांवर उपलब्ध करण्यात आल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.