नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे स्थलांतरित होणाऱ्या गावांच्या पुनर्वसन व पुन:स्थापनेच्या कामाला गती देण्यात आली आहे. या क्षेत्रात पायाभूत सुविधा व इतर विकासकामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे नियोजित वेळेतच डिसेंबर २0१९ मध्येच विमानाचे टेकआॅफ होईल, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी व्यक्त केला आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाऱ्या दहा गावांचे स्थलांतर होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या दहा गावांतील ३५00 कुटुंबे, लहान-मोठे व्यवसाय वडघर, वहाळ आणि कुंडे वहाळ येथे स्थलांतरित होणार आहेत. त्यादृष्टीने विकासकामांना गती दिली आहे. विमानतळबाधितांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापन होत असलेल्या परिसराचा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी मंगळवारी पाहणी दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यानंतर भूषण गगराणी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पुनर्वसन व पुन:स्थापनेची बहुतांशी विकासकामे जून २0१७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या सर्व मागण्या मान्य केल्याने गावांच्या स्थलांतराचा प्रश्नही निकाली निघाला आहे. स्थलांतरित होणाऱ्या प्रकल्पबाधितांना राहण्यास भाडेतत्त्वावरील किती जागा उपलब्ध आहेत याची पडताळणी केली आहे. बांधकाम व्यावसायिक व विविध असोसिएशनसोबत बैठका घेतल्यानंतर अशाप्रकारचे मुबलक पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच विविध स्तरावर सुरू असलेल्या कामांची प्रगती पाहता नवी मुंबई विमानतळावरून नियोजित वेळेत म्हणजेच डिसेंबर २0१९ मध्येच विमानाचे टेकआॅफ होईल, असा विश्वास गगराणी यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
डिसेंबर २0१९ मध्येच विमानाचे ‘टेकआॅफ’
By admin | Published: February 08, 2017 4:24 AM