नामदेव मोरे नवी मुंबई : फ्युजन इंटरनॅशनल कंपनीने केलेल्या हॉलिडे पॅकेज घोटाळ्याची व्याप्ती वाढली आहे. ३९० नागरिकांची यादी पोलिसांना मिळाली आहे. यामधील ५५ नागरिकांनी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून फसवणूक झालेल्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.पामबीच रोडवर सानपाडा सेक्टर १७मधील द अफिअर या आलिशान इमारतीच्या १९ व्या मजल्यावर डिसेंबर २०१६च्या दरम्यान फ्युजन इंटरनॅशनल कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. कंपनी व्यवस्थापनाने कॉल सेंटरच्या माध्यमातून व रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करून, हॉलिडे पॅकेज योजनेचा प्रचार सुरू केला. लकी ड्रॉसाठी निवड झाली असल्याचे सांगून, नागरिकांना कार्यालयात बोलावायचे व त्यांना एक ते दीड लाख रुपयांचे हॉलिडे पॅकेज आॅफर करायचे. ज्यांनी पैसे भरले त्यांनी हॉलिडे पॅकेजचा लाभ घेण्यासाठी संपर्क केल्यानंतर व्यवस्थापनाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. फोन करून व प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन पैसे परत मिळविण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न केला; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेर फसवणूक झालेल्या नागरिकांनी सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल झाला. प्रथम कंपनीचे संचालक विनय सोमपाल सिंग, विरेंद्र बालवीर सिंग, विशेष दिगांत व व्यवस्थापक दक्षय खरात विरोधात गुन्हा दाखल केला होता. यामधील विनय व दक्षयला पोलिसांनी जानेवारीच्या सुरुवातीस अटक केली होती. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.मुख्य आरोपी व कंपनी संचालक विरेंद्र सिंग व विशेष दिगांत यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली होती; परंतु सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने ग्राहकांना हॉलिडे पॅकेजचा लाभ द्या किंवा ५० लाख रुपये अनामत रक्कम जमा करा, असे सुनावले होते. यानंतर दोन्ही आरोपींनी सीबीडी न्यायालयात शरणागती स्वीकारली होती. सानपाडा पोलिसांनी त्यांना ३१ जानेवारीला अटक केली असून, त्यांना ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी फ्युजन इंडिया कंपनीच्या कार्यालयातून कागदपत्रे जप्त केली आहेत. नऊ महिन्यांमधील हॉलिडे पॅकेज दिलेल्या ग्राहकांची यादी पोलिसांच्या हाती सापडली आहे. तीन महिन्यांची यादी आरोपींनी गायब केली असण्याची शक्यता आहे. पोलिसांना तब्बल ३९० ग्राहकांची माहिती मिळाली आहे. याशिवाय बँक खात्यांच्या आधारेही माहिती संकलित केली आहे. फसवणूक झालेल्यांची संख्या ४००पेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे.>तक्रार करण्याचे आवाहनफ्युजन इंटरनॅशनल कंपनीने फसवणूक केल्याप्रकरणी सुरुवातीला पाच ते सहा जणांनी सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. डिसेंबरअखेर तक्रार देणाºयांची संख्या २२ झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर तक्रार करण्यासाठी नागरिक पुढे येऊ लागले आहेत. आतापर्यंत ५५ जणांनी तक्रार दिली आहे.>आरोपी वाढणारहॉलिडे पॅकेज घोटाळ्यामध्ये आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे; परंतु प्रत्यक्षात या रॅकेटमध्ये १५ ते २० जणांचा समावेश आहे. कार्यालयात काम करणाºया कर्मचाºयांचाही यामध्ये हात असल्याचे बोलले जाते. आरोपींचा आकडाही वाढण्याची शक्यता असून, रॅकेटमध्ये सहभाग असलेल्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.>कोट्यवधींचा घोटाळाफ्युजन इंटरनॅशनल कंपनीने हॉलिडे पॅकेजच्या नावाखाली फसवणूक केलेल्यांची संख्या ३९०पेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे. प्रत्येक नागरिकाकडून एक ते दीड लाख रुपये घेतले आहेत. काही जणांकडून ५० ते ६० हजार रुपयेही घेतले आहेत. जवळपास चार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हॉलिडे पॅकेजच्या नावे शेकडोंची फसवणूक, फसवणूक झालेल्यांचा आकडा ३९०पेक्षा जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 2:21 AM