घर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 01:41 AM2019-11-07T01:41:42+5:302019-11-07T01:41:48+5:30
कळंबोलीमधील घटना : ज्येष्ठ नागरिकाचे २१ लाख हडपले
पनवेल : विमा पॉलिसीच्या मोबदल्यात घर देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केल्याचा प्रकार कळंबोलीमध्ये उघडकीस आला आहे. तब्बल २१ लाख ४२ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयसिंग बाबुसिंग जमादार हे ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी भारती आस्का, बिरला सनलाइफ, एचडीएफसी, आयसीआयसीआय, मॅक्स या कंपनीच्या त्यांच्या व मुलाच्या नावे एक रकमी प्रीमियम भरून पॉलिसी काढल्या होत्या. या पॉलिसीच्या आधारे त्यांना प्राची शर्मा (रा. दिल्ली) या महिलेने संपर्क साधला व जमादार हे ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे टू बीएचके चा एक रूम मिळेल व त्यांचा मुलगा सचिन जमादार यास वन बीएचके रूम मिळेल, असे प्रलोभन दाखवले. या वेळी जमादार यांनी असे कोणी घर देत नाही, असे शर्मा यांना सांगितले.
मात्र, शर्मा यांनी पॉलिसी कंपनीकडे एकरकमी जास्त पैसे जमा झाल्यानंतर आमची कंपनी अशा वेळेस मोठ्या बिल्डरांशी संपर्क करून कमी किमतीत सदनिका विकत घेत असते, असे सांगून प्रथम प्लॉटची रक्कम रुपये दीड लाखाची मागणी केली. जमादार यांनी महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून रक्कम दीड लाख रुपये एनईएफटी द्वारे पाठवले. त्यानंतर पुन्हा वर्मा यांनी जमादार याना संपर्क करून परत दुसºया घरासाठी दीड लाख मागणी केली. त्यानुसार एनईएफटीद्वारे दीड लाख रुपये जमा केले. त्यानंतर काही दिवसांनी प्रियंका चौधरी यांनी मोबाइलवरून फोन करून प्राची शर्मा यांना कंपनीने नोकरीतून काढून टाकले आहे, असे सांगितले. तुम्ही या पुढे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याशी संपर्कात राहा, असे सांगितले.
या वेळी प्रियंका चौधरी हिने तिच्यासोबत काम करणाºया शोभा श्रीवास्तव, रेणुका वर्मा, वैशाली सक्सेना, प्रिया सक्सेना, जितकौर या बँकेत वेगवेगळ्या पदावर काम करीत असून, यापैकी कोणी फोन करून माहिती विचारली तरच त्यांना माहिती द्या, असे सांगितले.
त्यानंतर प्रियंका चौधरी या महिलेने जमादार यांच्याशी पुन्हा संपर्क साधून वेगवेगळी कारणे सांगून जमादार यांच्याकडून पैशांची मागणी केली. त्यानुसार जमादार यांनी २१ लाख ४२ हजार २९३ रु पये त्यांना दिले; परंतु प्रत्यक्षात त्यांना घरांचा ताबा दिला नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास येताच संबंधितांविरोधात खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून फसवणूक करणाºया टोळीचा पोलिसांनी शोध सुरु केला आहे.