राम मंदिर-बाबरी मशिदीचा निर्णय घ्या
By admin | Published: March 27, 2017 06:41 AM2017-03-27T06:41:45+5:302017-03-27T06:41:45+5:30
राम मंदिर व बाबरी मशिदीचा वाद न्यायालयाबाहेर मिटवण्यासाठी राम मंदिर-बाबरी
मुंबई : राम मंदिर व बाबरी मशिदीचा वाद न्यायालयाबाहेर मिटवण्यासाठी राम मंदिर-बाबरी मशीद कृती समितीने दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत केंद्र सरकारने हस्तक्षेप करत अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद दोन्हीही उभारून वाद मिटवावा. अन्यथा या ठिकाणी राम रहीम रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था उभारून वादावर कायमस्वरूपी पडदा टाकण्याची विनंती कृती समितीने केली आहे.
समितीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृती समितीची भूमिका स्पष्ट केली. पाटील म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या वादामुळे देशभर दंगली होत असून दोन्ही धर्मांत तेढ निर्माण झाली आहे. काही राजकीय व्यक्तींनी या वादाचा फायदा घेत वाद मिटवण्याऐवजी तो धुमसता ठेवण्यातच धन्यता मानली आहे.
अराजकीय व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन कृती समितीमार्फत २९ मार्चला दिल्ली येथे बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत हिंदू व मुस्लीम धर्मातील प्रमुख व्यक्तींसह, माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ वकील, कायदेशीर सल्ला देणाऱ्या नामांकित व्यक्ती आणि प्रमुख राजकीय व्यक्तींना आमंत्रित केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीत तोडगा निघाला नाही, तर केंद्र सरकारने या प्रकरणात मध्यस्थी करून संबंधित जागेवर रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था उभारून हा वाद कायमस्वरूपी मिटवण्याचे आवाहन कृती समितीतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)