वीज बिलात शहरवासीयांना मिळणार दिलासा, सवलत देण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 12:06 AM2020-06-26T00:06:41+5:302020-06-26T00:08:01+5:30
तसेच वाढीव बिलासंदर्भातसुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबई : अगोदरच लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांना महावितरणने वाढीव बिलाचा शॉक दिला आहे. ग्राहकांना मागील तीन महिन्यांची एकत्रित बिले पाठविण्यात आल्याने ती भरायची कशी, असा सवाल नागरिकांना सतावत आहे. परंतु ग्राहकांना थकीत देयके भरण्यासाठी महावितरणने सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वाढीव बिलासंदर्भातसुद्धा सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबइतील वीज ग्राहकांच्या समस्यांबाबत ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी सिडको गेस्ट हाऊसमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. महावितरणने अनेक ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठवली आहेत. ज्या ग्राहकाचे महिन्याचे बिल एक हजार रुपये आहे त्याला चक्क चार लाख रुपयांचे बिल पाठवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांचे एकत्रित बिल भरता येणार नाही. बिल भरले नाही म्हणून त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करू नका. देयकाची थकबाकी रक्कम समान हप्त्यात विभागून द्या, अशा सूचना त्यांनी या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार वाढीव बिले कमी करण्यासाठी आणि मागणीनुसार वीज बिलाचे हप्ते पाडून देण्यास महावितरणच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी तयारी दर्शविली आहे. त्यासाठी तीन विशेष अधिकाºयांची नियुक्ती करण्याचे त्यांनी मान्य केले आहे. महावितरच्या या निर्णयामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या बैठकीला वडार समाज आर्थिक विकास समितीचे सभापती विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, राष्ट्रवादीचे सचिव प्रशांत पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, काँग्रेसचे रमाकांत म्हात्रे, महावितरणचे अ. अभियंता राजाराम माने आदी उपस्थित होते.