नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे महामुंबईसह राज्यात कच्च्या तेलाची मागणी वाढत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन कंपनीने नवी मुंबई आणि समुद्रातील जवाहर आयलंडवर कच्चे तेल साठविण्यासाठी नवे टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावास सीआरझेडने मान्यता देऊन प्रस्ताव केंद्रीय वने पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला आहे.
जवाहर आयलंडवर एचपीसीएल १२ विस्तीर्ण टाक्यांचे हे टर्मिनल बांधणार आहे. याठिकाणी २८० टीएमटी इतके कच्चे तेल आणि नाफ्ता साठविण्याची सोय होणार आहे. या १२ टाक्यांपैकी नाफ्ता साठविण्यासाठीच्या चार आहेत. जवाहर द्विपवर पाच जेट्टींची सोय आहे. यात जेट्टी क्रमांक १ ते ३ पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या वाहतुकीसाठी वापर होत असून, जेट्टी क्रमांक ४ आणि ५ वरून कच्च्या तेलाची वाहतूक होत आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्ट देणार १५ हेक्टर जागा
कच्च्या तेलाच्या नव्या टर्मिनलसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने एचपीसीएलला १५ हेक्टर जागा ३० वर्षांच्या लीजवर देण्याची तयारी दर्शविली आहे. यापैकी १३ हेक्टर जागा भराव केलेली आहे. यामुळे नव्याने भराव करण्याची गरज भासणार नसल्याचे एचपीएसीएलने याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे. प्रस्तावित जागेत खारफुटी नसल्याचा दावा करून टर्मिनल बांधताना एकही खारफुटी बाधित होणार नाही.
टर्मिनल बांधण्यासाठी तात्पुरत्या दोन जेट्टी
- एचपीसीएल कच्चे तेल आणि नाफ्ताच्या साठवणुकीसाठी जे नवे टर्मिनल बांधणार आहे, त्यासाठी लागणाऱ्या कच्या मालाची ने-आण करण्यासाठी दोन जेट्टी बांधणार आहे. काम पूर्ण होऊन टर्मिनल कार्यान्वित झाल्यावर या जेट्टी समुद्री पर्यावरणाचे भान राखून नष्ट करण्याचा प्रस्ताव एचपीसीएलने सीआरझेडला दिला आहे.
- प्रदूषण टाळण्यासाठीच्या उपाययोजना
- टर्मिनल बांधताना समुद्री पर्यावरणास कोणतीही बाधा होणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात येणार आहे. कच्च्या तेलाच्या टाक्याही अमेरिकन तंत्रज्ञानाप्रमाणे बांधण्यात येणार आहेत. बांधकाम करताना निर्माण होणाऱ्या कच्या मालाची ड्रममध्ये याेग्य साठवणूक करून ते प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुन:प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे.
मच्छीमारांची घेणार काळजी
टर्मिनलच्या बांधकामामुळे तेल-ऑइलचे लिकेज होऊन मासळी उत्पादनावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. शिवाय कच्च्या मालाची ने-आण करणाऱ्या जहाजामुळे मच्छीमारांच्या बोटींच्या मार्गात अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. टर्मिनलचे बांधकाम हे भूकंप आणि त्सुनामी रोधक असणार आहे.
रिलायन्सच्या इथेलिन पाइपलाइनला मंजुरी
रिलायन्स समूहाच्या जेएनपीटी ते रायगडमधील नागोठणे पर्यंतच्या इथेलीन वाहून नेणाऱ्या पाइपलाइनसाठीही सीआरझेडने मंजुरी दिली आहे. ६२ किमीची ही पाइपलाइन असून त्यातील १५ किमीची नवीन तर ४७ किमीची जुनी आहे. यात ६८८.६९ मीटर खारफुटी बाधीत होणार आहे.