नवी मुंबई : नेमणुकीच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या अखेर निकाली लागल्या आहेत. त्यात १२ पोलीस निरीक्षकांच्या समावेश आहे. लॉकडाऊनमुळे हा निर्णय लांबणीवर गेला होता.लॉकडाऊन काळात पोलिसांवर बंदोबस्ताची प्रमुख जबाबदारी आल्याने पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाहरण बदल्यांचा निर्णय लांबणीवर गेला होता. अखेर शुक्रवारी रात्री निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यात १२ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. शुक्रवारी काढण्यात आलेल्या बदलीच्या आदेशानुसार, खारघर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप तिदार यांची कोपरखैरणेला, पनवेल तालुकाचे अशोक राजपूत यांची विशेष शखेला, एपीएमसीचे सतीश निकम यांची सुरक्षा शाखेत, कोपरखैरणेचे सूर्यकांत जगदाळे यांची दंगल निवारण पथकात, नेरुळचे राजेंद्र चव्हाण यांची आरबीआय सुरक्षा शाखेत, वाशी पोलास ठाण्याचे रवींद्र दौंडकर यांची पनवेल तालुका पोलीस ठाण्यात, पनवेल शहरचे शत्रुघ्न माळी यांची खारघर पोलीस ठाणे, खांदेश्वर पोलीस ठाण्याचे शाम शिंदे यांची नेरुळ पोलीस ठाण्यात तळोजा वाहतूक शाखेचे राजेंद्र आव्हाड यांची तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात, खारघर पोलीस ठाण्याचे महेश पाटील यांची तळोजा वाहतूक शाखेत, सानपाडा पोलीस ठाण्याचे विकास रामुगडे यांची एपीएमसी पोलीस ठाणे येथे, तर एनआरआय पोलीस ठाण्याचे रवींद्र पाटील यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे शिरीष पवार यांना पुढील बदल्यांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आयुक्तालयांतर्गत पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, लॉकडाऊनमुळे निर्णय लांबणीवर गेला होता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:48 PM