'कारखानदारीमुळे शेती क्षेत्रात घट, शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 09:09 AM2023-02-12T09:09:41+5:302023-02-12T09:09:51+5:30
शरद पवार : शेतीवरील भार कमी व्हावा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नागरीकरण व कारखानदारीमुळे शेतीच्या क्षेत्रात घट होत आहे. शेतीवरील भार कमी केला पाहिजे. शेतीला आधुनिकतेची जोड देण्याची गरज असून, इतर व्यवसायाकडेही वळले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नवी मुंबईत व्यक्त केले.
मुंबई देशस्थ मराठा ज्ञाती धर्म संस्थेच्या माध्यमातून सानपाडामध्ये उभारलेल्या देशस्थ मराठा भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. त्यांनी यावेळी मुंबईतील गिरणी कामगार ते कृषी व्यापारातील बदलाचा आढावा घेतला. कृषी व्यापार नवी मुंबईमध्ये स्थलांतर केल्यानंतर त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात व देशात फळ उत्पादन वाढविण्यासाठी सत्तेत असताना प्रयत्न केले. आता फळ उत्पादनामध्ये मोठी वाढ झाली आहे. देशात विकासकामे करण्यासाठी जमिनी संपादन कराव्या लागत आहेत. शहरीकरण वाढत आहे. कारखानदारी वाढत आहे. यामुळे शेतीसाठीची जमीन कमी होत आहे.
माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, जुन्नर, आंबेगाव परिसरातील शेतकरी व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी प्राधान्य दिले असून, यापुढेही सर्वांना सोबत घेऊन कामे करणार असल्याचे स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनी बाजारपेठेच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. आमदार अतुल बेनके यांनीही जुन्नर तालुक्यात कृषी पर्यटनाला चालना देणार असल्याचे स्पष्ट केले. समितीचे संचालक संजय पानसरे, संस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र नलावडे यांची भाषणे झाली. संस्थेचे अध्यक्ष राजन थोरवे, बाळासाहेब दांगट, आशाताई बुचके, अशोक हांडे, शंकर पिंगळे, चंद्रकांत ढोले, भगवान थोरात, महेश मुंढे, नामदेव भगत, बाळासाहेब सोळसकर, संदीप सुतार उपस्थित होते.