- योगेश पिंगळेनवी मुंबई : दिवाळीनिमित्ताने भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मिठाईचा वापर केला जातो, परंतु या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने भीतीमुळे मिठाईच्या खरेदीत काही प्रमाणात घट झाली असून सुक्या मेव्याच्या खरेदीत वाढ झाली आहे.
दिवाळीच्या निमित्ताने कार्यालयांचे कर्मचारी, नातेवाईक, मित्र आदींना भेट म्हणून मिठाई दिली जाते. दरवर्षी बाजारात मिठाईच्या विविध कंपन्यांचे वेगवेगळे प्रकार दाखल होत असून ग्राहकांचादेखील त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. या वर्षीदेखील बाजारात विविध प्रकारच्या मिठाई दाखल झाल्या आहेत.
परंतु कोरोनाचे संकट असल्याने ग्राहकांची पेढा, बर्फी, मोतीचूर लाडू, काजू कतली, मैसूर, हलवा, बेसन लाडू, ड्रायफ्रूट बर्फी यासारख्या तयार मिठाईला काही प्रमाणात मागणी कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ग्राहक काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे, अक्रोड यासारख्या सुक्या मेव्याच्या आकर्षक पॅकिंगच्या खरेदीला पसंती दिली जात आहे. कोरोनाकाळात घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या आर्थिक तोट्यामुळे बंद झाल्या असून त्याचादेखील परिणाम मिठाईच्या व्यवसायावर झाला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच सुका मेवा मिठाईच्या तुलनेत कमी गोड असल्याने आणि बंद डब्यात उपलब्ध होत असल्याने मिठाईपेक्षा सुक्या मेव्याच्या मागणीचे प्रमाण या वर्षी काही प्रमाणात वाढले आहे. - प्रकाश जैसवाल, मिठाई व्यावसायिक