नवी मुंबई : डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यात शहराचे तापमान खालावले होते. तेव्हा १९ अंश तापमानाची नोंद झाली झाली होती. त्यानंतर पुन्हा वातावरणातील उष्णता वाढून थंडी गायब झाली. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडीचे आगमन झाले असून बुधवारी कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. हुडहुडी भरणाऱ्या या थंडीमुळे शहरातील वातावरणात बदल झाला असून पहाटेच्या वेळी धुक्याची दुलई अंथरलेली पहायला मिळते.आरोग्याविषयी जागृत असलेल्या नागरिकांनी सकाळी जवळील जॉगिंग ट्रॅक, व्यायामशाळा तसेच मोकळ््या मैदानांमध्ये गर्दी केल्याचे पहायला मिळते. शाळकरी मुलेही सकाळच्या या थंडगार वातावरणात स्वेटर घालून शाळेत जाताना दिसून येत आहेत. तापमानात झालेल्या या बदलामुळे सकाळच्या वेळेत हवेमधील गारवा वाढला असून झाडांवरही दवबिंदू पहायला मिळतात. या गुलाबी थंडीमुळे सकाळच्या वेळी चहाच्या टपऱ्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून नवी मुंबईकरांना या बोचऱ्या थंडीचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. सकाळच्या वेळी रस्त्यावरील नागरिक लोकरीचे उबदार कपडे, शाल, कानटोप्या घालून बाहेर पडत आहेत. या गुलाबी थंडीचे पुन्हा एकदा आगमन झाल्याने शहरातील नेहमीच्या उष्ण-दमट वातावरणामुळे त्रस्त झालेले नागरिक सुखावले आहेत. गुरुवारी नवी मुंबईचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.
नवी मुंबईच्या तापमानात घट
By admin | Published: January 22, 2016 2:23 AM