पदवीधर मतदारसंघातील मतदार संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 01:39 AM2018-05-31T01:39:08+5:302018-05-31T01:39:08+5:30
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असताना आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकदेखील तोंडावर आली
वैभव गायकर
पनवेल : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असताना आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूकदेखील तोंडावर आली आहे. ही निवडणूक येत्या २५ जून रोजी होणार आहे. मात्र, या निवडणुकीबाबत तसेच मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यास निवडणूक अधिकाऱ्यांसह राजकीय पक्ष देखील उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
शिवसेना, भाजपा,शेकाप आघाडी अशी तिरंगी लढत या निवडणुकीत पहावयास मिळणार आहे. या निवडणुकीत मतदारांची घट हा चिंतेचा विषय बनला आहे. मतदार नोंदणीमध्ये राजकीय पक्षाच्या उदासीनतेमुळे मतदारांमध्ये फारशी वाढ झाली नाही. उलट गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा २0 हजार मतदार घटले आहेत. पालघर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे कोकण पदवीधर मतदारसंघात येतात. २0१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात १ लाख ९ हजार मतदार नोंदणी झाली होती. आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ९0 हजार २५२ इतकी मतदार नोंदणी झाली आहे. त्यामुळे सुमारे २0 हजारांनी पदवीधर मतदार संख्या घटली आहे. पदवीधर मतदारांमध्ये असलेल्या मतदानाविषयी निरुत्साह या माध्यमातून स्पष्ट झाला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ १९८८ मध्ये अस्तित्वात आला. यावेळी केवळ ६ हजार मतदार नोंदणी झाली होती. त्यावेळी ठाणे येथील भाजपाचे उमेदवार वसंत पटवर्धन विजयी झाले होते. १९९४ मध्ये या मतदारसंघात १२ हजार मतदार नोंदणी झाली. मतदार दुप्पट वाढले. त्यावेळी डॉ. अशोक मोडक आमदार म्हणून निवडून आले. २00६ साली तब्बल ६६ हजार मतदार नोंदणी झाली. त्यावेळी भाजपाचे संजय केळकर यांनी राष्ट्रवादीचे नीलेश चव्हाण यांचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव केला होता तर २0१२ मध्ये पदवीधर मतदार वाढले त्यासाठी राष्ट्रवादीने जोर लावला आणि मतदार संख्या १ लाख ९ हजारांवर गेली. यावेळी राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे यांना २७,६३३ तर भाजपाचे संजय केळकर यांना २२ हजार ९२ मते मिळाली आणि डावखरे ५६४१ मतांनी विजयी झाले. पारंपरिक भाजपाकडे असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्याकडे खेचून आणला होता. आता २५ जून रोजी याच मतदारसंघात निवडणूक होत आहे. त्यामुळे सत्तेत असलेली
भाजपा पुन्हा एकदा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरेंना आपल्या गळाला लावत त्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला आहे. त्यामुळे भाजपा या मतदार संघाकरिता आपली ताकद पणाला लावणार आहे हे निश्चित झाले आहे. नुकतीच कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी आपल्या मुलाला निवडणुकीत उतरविले होते. शेकापने यावेळी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. अनिकेत तटकरे हे या मतदारसंघातून एकतर्फी विजयी झाले.यामुळे एक पाऊल मागे घेत राष्ट्रवादी ही जागा शेकापला सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे .
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील पालघर जिल्ह्यात १५१३५, ठाणे जिल्ह्यात ३७,२५४, रायगड जिल्ह्यात २४१५८ , रत्नागिरी जिल्ह्यात १५,५0७, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५८७ पदवीधर मतदार नोंदणी झाली आहे. ही निवडणूक २५ जून रोजी होणार असून निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे.कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणूक चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादीतर्फे ही जागा शेकाप सोडण्याची शक्यता आहे. शेकापच्या अलिबाग नगरपरिषदेच्या नगरसेविका व शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची सून चित्रलेखा पाटील या आघाडीच्या मार्फत लढण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून माजी महापौर संजय मोरे यांचे नाव चर्चेत आहे.
नावनोंदणीकरिता टाळाटाळ
कोकण पदवीधर मतदार संघाच्या नावनोंदणीसाठी हजारो मतदार इच्छुक असताना देखील या मतदारांना तालुकानिहाय तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकाºयांकडून योग्य माहिती दिली जात नाही. या मतदार संघातील मतदारांना मतदार यादीत नाव नोंदण्यासाठी ३१ मे अंतिम तारीख असून देखील अनेक ठिकाणी अर्जदारांचे अर्ज स्वीकारले जात नाहीत असा आरोप खारघरमधील मंगेश रानवडे यांनी केला आहे . शासकीय अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले आहे. यावर्षी देखील हजारो मतदारांना आपले नाव मतदान यादीत येण्याची प्रतीक्षा आहे.