एमआयडीसीत डेब्रिज माफियांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 02:38 AM2018-04-11T02:38:17+5:302018-04-11T02:38:17+5:30

एमआयडीसी परिसरामध्ये डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला आहे. रोज शेकडो डंपरमधून डेब्रिज खाली केले जात आहे.

The DEDR mafia eruption in MIDC | एमआयडीसीत डेब्रिज माफियांचा धुमाकूळ

एमआयडीसीत डेब्रिज माफियांचा धुमाकूळ

googlenewsNext

नामदेव मोरे 
नवी मुंबई : एमआयडीसी परिसरामध्ये डेब्रिज माफियांनी धुमाकूळ घातला आहे. रोज शेकडो डंपरमधून डेब्रिज खाली केले जात आहे. इंदिरानगरजवळ नैसर्गिक नाल्यात भराव करण्यात आला असून, गणपती पाड्यामध्ये खदान तलावही बुजविण्यात आला आहे. डेब्रिज विरोधी भरारी पथकाच्या आशीर्वादाने हे अतिक्रमण सुरू असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.
ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये डेब्रिजची अनधिकृत डंपिंग ग्राउंड तयार होऊ लागली आहेत. अडवली- भुतावलीमध्ये हजारो डंपरमधून डेब्रिजचा भराव करण्यात आला असून, जवळपास १०० फूट उंच टेकडी तयार झाली आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यानंतर तेथील अतिक्रमण काही प्रमाणात थांबले असून, डेब्रिज माफियांनी इतर परिसरामध्ये नवीन डंपिंग ग्राउंड तयार केले आहे. इंदिरानगरमधील शांताबाई जामा सुतार उद्यान व हिरादेवी मंदिर परिसरामधील नैसर्गिक नाल्यात मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव करण्याचे काम सुरू आहे. रोज शेकडो डंपरमधून डेब्रिज टाकले जात असून, महापालिका व एमआयडीसी प्रशासन या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात नाल्यातील पाणी जाण्यासाठी मार्गच भेटणार नसून, या ठिकाणी तलाव तयार होणार आहे.
गणपती पाडा परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात डेब्रिजचा भराव सुरू करण्यात आला आहे. एक महिन्यापासून डेब्रिज माफिया येथे भराव करत आहेत. महापालिकेने किंवा एमआयडीसीने डेब्रिज टाकण्यासाठी परवानगी दिल्याचा फलक येथे लावण्यात आलेला नाही. येथील खदाणीमध्ये तलाव तयार झाला होता. हा तलाव अर्धा बुजविण्यात आला आहे. डेब्रिज टाकणारे रात्री भराव टाकण्यासाठी भूखंडाच्या मार्गावर डेब्रिज टाकून ठेवतात. दुसरे कोणीही या परिसरात डेब्रिज टाकू नये, यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. जेव्हा डेब्रिजचा भराव करायचा असतो, तेव्हा जेसीबीच्या साहाय्याने रोड तयार केला जातो. बिनधास्तपणे येथे भराव केला जात आहे. याविषयी नागरिकांनी महापालिकेच्या पथकाकडे तक्रार केली आहे; पण डेब्रिज विरोधी भरारी पथक काहीही कारवाई करत नाही. दोन दिवसांपूर्वी भरारी पथकाची गाडी या परिसरात आली होती. नागरिकांनी गाडीचे फोटो काढण्यास सुरुवात करताच, भरारी पथकाच्या कर्मचाºयांनी तेथून पलायन केले. शहरात नागरिकांनी घरदुरुस्ती करून निघालेला प्लास्टरचा कचरा मोकळ्या जागेवर टाकण्याचा प्रयत्न केल्यास महापालिकेचे भरारी पथक तत्काळ कारवाई करते; परंतु शेकडो डंपर खाली करणाºया माफियांना मात्र अभय दिले जात आहे. एमआयडीसीमध्ये जागा मिळेल त्या ठिकाणी भराव सुरू असून भविष्यात त्याचे गंभीर परिणाम शहरवासीयांना सहन करावे लागणार आहेत.
एक गाडीचे २०० रुपये
शांताबाई जोमा सुतार व हिरादेवी मंदिराच्या मधील नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात भराव सुरू आहे. ‘लोकमत’ने या परिसरामध्ये जाऊन पाहणी केली असता जवळपास ५० फूट उंच टेकडी तयार झाली आहे. या ठिकाणी एका राजकीय पदाधिकाºयाच्या आशीर्वादाने डेब्रिज टाकले जात असून, या पदाधिकाºयाला एक गाडीसाठी २०० रूपये दलाली दिली जात आहे. राजकीय आशीर्वादाने भरावाचे काम सुरू आहे.
मुंबई-ठाणेतील कचरा नवी मुंबईत
नवी मुंबई परिसर डेब्रिजचे डंपिंग ग्राउंड झाले आहे. ठाणे व मुंबईतील बांधकामाचा कचरा एमआयडीसीमध्ये टाकला जात आहे. रोज शेकडो डंपरमधून डेब्रिज आणले जात आहे. नागरिक याविषयी तक्रारी करत असतानाही भरारी पथक बघ्याची भूमिका घेत आहे.
भरारी पथकाने काढला पळ
गणपती पाडा परिसरामध्ये महापालिकेच्या भरारी पथकाची गाडी नियमितपणे येत असते. डेब्रिज टाकणाºयांची भेट घेऊन कारवाई न करताच कर्मचारी परत जातात. काही दिवसांपूर्वी भरारी पथकाच्या गाडीचा नागरिकांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटो काढला जात असल्याचे लक्षात येताच कर्मचाºयांनी तेथून पळ काढला.

Web Title: The DEDR mafia eruption in MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.