नवी मुंबई : विविध कारणांमुळे मागील अनेक वर्षे रखडलेल्या साडेबारा टक्के योजनेअंतर्गत भूखंडवाटपाला सिडकोने गती दिली आहे. शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत १४२ भूखंडांची सोडत काढण्यात आली. यात ठाणे व रायगड जिल्ह्यांतील भूखंडांचा समावेश आहे.साडेबारा टक्के योजनेतील भूखंडवाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आता केवळ ८ टक्के प्रकरणे शिल्लक आहेत; परंतु मध्यंतरीच्या काळात भ्रष्टाचार आणि इतर कारणांमुळे या योजनेला खीळ बसली होती. असे असले तरी गेल्या महिन्यापासून या योजनेला गती देण्यात आली आहे. सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील १४२ भूखंडांची शुक्रवारी सोडत काढण्यात आली. यात एकूण १६२ भूखंड आरक्षित करण्यात आले. यात उलवे, करंजाडे, नावडे व तळोजा या नोडमधील भूखंडाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २00७ नंतर पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी सोडत काढण्यात आली. यात घणसोली, तळवली येथील १६ भूखंडांचा समावेश आहे. या सोडतीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण, सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लंवगारे-वर्मा, नवी मुंबई महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पनवेल महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साडेबारा टक्के योजनेतील १४२ भूखंडांची सोडत
By admin | Published: March 26, 2017 5:03 AM