विजयासाठी उमेदवारांचे देवांना साकडे
By admin | Published: May 10, 2017 12:27 AM2017-05-10T00:27:53+5:302017-05-10T00:27:53+5:30
पनवेल महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची धांदल उडाली आहे. साऱ्याच पक्षांचे उमेदवार
मयूर तांबडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : पनवेल महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होत आहे. त्यामुळे उमेदवारांची धांदल उडाली आहे. साऱ्याच पक्षांचे उमेदवार सकाळी मंदिर व मशीदमध्ये जाऊन देवदेवतांना विजयाचे साकडे घालत आहेत. धार्मिक स्थळांना भेट देत अनेक उमेदवारांनी प्रचाराला सुरु वात केली.
प्रमुख पक्षांसह अपक्षांनी देखील विजयासाठी देवांना साकडे घातले आहे. गेल्या काही दिवसांपासून उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी देवालयांमध्ये एकच गर्दी केली आहे. प्रचारांचे नारळ फोडून उमेदवार प्रचाराला लागले आहेत. शहरातील मंदिरात आरती करून काहींनी अभिषेक घातले. महापालिका निवडणुकीत पनवेल शहरात वीस प्रभाग असून ७८ नगरसेवक निवडून येणार आहेत. ६३६ उमेदवारांनी निवडणुकीचे अर्ज भरले होते. यातील ४९ अर्ज अवैध ठरले आहेत. निवडणुकीसाठी झालेल्या छाननीत सूचक, अनुमोदक वेगळ्या प्रभागातील असणे, दोन वेगवेगळ्या प्रभागात अर्ज सादर करणे यामुळे हे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. नावडे येथील केंद्रातून ९ (प्रभाग क्र .१,२,३,), खारघर केंद्रातून ७ (प्रभाग ४,५,६,) , कळंबोली केंद्रातून १ (प्रभाग ७,८,९,१०) , कामोठे केंद्रातून १५ (प्रभाग ११,१२,१३) ,नवीन पनवेल केंद्रातून ४ ( प्रभाग १४,१५,१६), आणि पनवेल केंद्रातून १३ (प्रभाग १७,१८,१९,२०) असे एकूण ४९ अर्ज अवैध ठरले. एकूण ६३६ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात उरले आहेत.
सर्वच पक्षांसह अपक्षांनी देखील महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. मोठ्या संख्येत येथून उमेदवार लढत आहेत. महापालिका निवडणुकीसाठी साऱ्याच पक्षांनी आपला प्रचाराचा मेगाप्लॅन तयार केला आहे. ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. १२ मे रोजी चिन्हवाटप आणि उमेदवार यादी प्रसिद्ध होईल. त्यामुळे पनवेल परिसरात रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी सर्वप्रथम देवांना विजयासाठी साकडे घातल्याचे दिसून आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येत मंदिर, मशीद, गुरु द्वारा व बुद्धविहार आहेत. या सर्वच ठिकाणी उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे. उमेदवारांसह मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांना सोबत घेवून विजयी होण्यासाठी देवांना साकडे घालण्यात येत आहे. नारळ, हार, पेढ्यांचा प्रसाद उमेदवारांकडून वाहिला जात आहे. गेल्या दोन ते चार दिवसांपासून महापालिका निवडणुकीचा खऱ्या अर्थाने बिगुल वाजला आहे. इतरांपेक्षा आपणच कसे सरस राहू यावर प्रत्येक उमेदवार भर देत आहे. २४ मे रोजी मतदान आणि २६ मे रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्र म आहे.