बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, ५० टन माल कचऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 04:08 AM2018-11-16T04:08:40+5:302018-11-16T04:09:20+5:30
५० टन माल कचऱ्यात : वांगी आणि कोबी खराब होण्याचे प्रमाण वाढले
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली असल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. गुजरातवरून आलेल्या वांग्याला उठाव नसल्यामुळे व माल खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्यात फेकून द्यावा लागला. ५० टनपेक्षा जास्त माल फेकून द्यावा लागला असून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पावसाळ्यात लागवड केलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात येवू लागला आहे. मंगळवारी तब्बल ७८१ ट्रक व टेंपोची आवक झाली होती. १९५२ टन पालेभाज्यांचीही आवक झाली होती. आवक वाढू लागल्यामुळे बाजारभाव कोसळू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये वांग्याची आवकही प्रचंड वाढली आहे. पुणे, नाशिक परिसराबरोबर गुजरातवरून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी येत आहे. गुरुवारी तब्बल ३५३ क्विंटल वांगी विक्रीसाठी आली होती. त्यामध्ये खराब मालाची विक्री झाली नसल्यामुळे तो फेकून द्यायची वेळ आली. हलक्या दर्जाची वांगी ६ ते १० रुपये किलो दराने विकली गेली. चांगल्या दर्जाची वांगी १४ ते २० रुपये किलो दराने विकली गेली. टोमॅटोची आवकही वाढली आहे. सद्यस्थितीमध्ये ३२२ टन टोमॅटोची आवक होवू लागली आहे. ३ ते ६ रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात आहे. घसरलेल्या भावामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागले आहे. १३१ टन कोबीचीही आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये कोबी ४ ते ८ रुपये किलो दराने विकण्यात आला. भोपळा, काकडी, सिमला मिरची, फ्लॉवर व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. खराब मालाचे प्रमाणही वाढले असून मोठ्या प्रमाणात माल कचºयामध्ये फेकून द्यावा लागत आहे.
बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गुरुवारी खराब झाल्यामुळे ५० टनपेक्षा जास्त माल फेकून द्यावा लागला आहे. मार्केटमध्ये खराब मालाचे ढिगारे पाहावयास मिळत होते. मागणीपेक्षा आवक जास्त झाली असल्यामुळे बाजारभाव कमी झाले आहेत. हलक्या दर्जाचा माल खरेदीच केला जात नसून तो फेकून द्यावा लागत आहे. विक्री न झालेला माल दुसºया दिवशी कमी दराने विकावा लागत असून तो खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईमध्ये चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी मुंबईत माल विक्रीसाठी पाठवत आहेत. गुजरात व इतर ठिकाणचे शेतकरी व व्यापारीही मुंबईत माल पाठवत आहेत. परंतु येथेही बाजारभाव मिळत नसल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.
या आठवड्यामध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी झाले आहेत. खराब मालाचे प्रमाणही वाढत असून तो फेकून द्यावा लागत आहे.
- शंकर पिंगळे,
व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसी
बाजार समितीमधील आवक पुढीलप्रमाणे
वस्तू आवक (क्विंटल)
भोपळा १०६०
फ्लॉवर १७७१
गाजर १७२१
कोबी १३१०
टोमॅटो ३२२८
वांगी ३६२
कांदापात ७३७००
कोथिंबीर १८२४००
मेथी ९६८००
पालक २६३००
पुदिना ९५७००