नवी मुंबई : माणगावमधील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये आयोजित युवा छावणी शिबिरामध्ये राज्यभरातील तरुण उपस्थित होते. या शिबिरामुळे स्वविकासाची परिभाषा बदलली असल्याचे मत तरुणांनी व्यक्त केले आहे.साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये प्रत्येक वर्षी १ ते ८ मे दरम्यान युवा छावणी शिबिराचे आयोजन केले जाते. परीक्षा संपल्यानंतर सुट्टीच्या काळात तरुणांमध्ये चांगले विचार रुजवावे, त्यांना श्रमाचे महत्त्व पटावे, यासाठी हे शिबिर आयोजित केले जाते. या वर्षीच्या शिबिरासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ६०पेक्षा जास्त युवक-युवती उपस्थित होत्या. प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम घेऊन हे शिबिर राबविले जाते. यामुळे ‘स्वभान’ ते ‘समाजभान’ या प्रवासाची दिशा शोधण्यासाठी शिबिरार्थींना मदत होते. यावर्षी विज्ञान ही थीम घेण्यात आली होती. यामध्ये अमोल यादव, विवेक सावंत, अतुल पेठे, संजीव चांदोरकर, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, डॉ. विजय नाईक, डॉ. नरेश दधीच यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. अत्यंत द्विधा मन:स्थितीत असलेल्या सर्व शिबिरार्थींना हे शिबिर संपू नये असे वाटत होते. डोक्यातील सगळ्या शंकांचे निरसन होऊन समाजभान जगण्याची दिशा सापडल्यासारखे वाटत असल्याचे मत तरुणांनी या वेळी व्यक्त केले. शिबिराच्या समारोपप्रसंगी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे माजी अध्यक्ष युवराज मोहिते, कार्याध्यक्ष प्रमोद निगुडकर, दिनकर पाटील, राजन इंदुलकर, संदेश कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते.समाजाच्या सद्यस्थितीकडे संविधानिक मूल्यांच्या फे्रममधून पाहायला शिकवणारी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाची युवा छावणी, उद्याचे विवेकी, विज्ञाननिष्ठ नागरिक घडविण्याचे काम करीत आहे. तरुणांना मोकळेपणाने व्यक्त होण्याची संधी देत सामाजिक संदेश देणारी गाणी आणि व्यक्तिमत्त्व विकास शिकवणारे खेळ, या माध्यमातून तरुणांना त्यांच्याच भाषेतून संवाद साधत आहेत.शिबिरादरम्यान सहभागी झालेल्या युवक व युवतींनी रोज दोन तास श्रमदान करून स्मारक परिसरातील जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यास मदत केली.
स्वविकासाची परिभाषा बदलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 5:57 AM