मिलिंद अष्टीवकर, रोहारोहा तालुक्यात डोंगरांना सतत वणवे लागत असल्याने येथील वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात वनसंपदा लाभलेल्या येथील पर्वत रांगा गेली आठ दिवस सतत आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने झाडेझुडपे, गवत जळून खाक झाल्याने परिसरातील हजारो जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. मागील दोन महिन्यांत डोंगरांमध्ये सातत्याने हे वणवे पेटलेले दिसून येत आहेत. गेल्या ८ दिवसांत ५ ठिकाणी वणवे लागले होते. रोहा वन विभागाची टीम हे पेटलेले वणवे विझविण्याचा प्रयत्न करतात,यासाठी त्यांना काही ठिकाणी गावकऱ्यांची मदत मिळत असली तरी जीव धोक्यात घालून वनपाल ही वाढत जाणारी आग रोखण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.रोहा तालुका हा चहुबाजूंनी डोगररांगांनी बहरलेला आहे. उन्हाळ्यात मार्च, एप्रिल आणि मेमध्ये येथील डोंगरांना सतत वणवे लागण्याचे प्रकार गेल्या आठ-दहा दिवसांपासून घडत आहेत. तालुक्यातील कळसगिरी, हनुमान टेकडी, पाले, मढाली, खैरवाडी आणि अवचितगड मेढा पंचक्र ोशी आदी वरकस ठिकाणी वणवे लागल्याने वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. सायंकाळी व रात्रीच्या वेळी येथील डोंगरमाथा आगीने होरपळत असल्याचे दिसून येते. वणव्यांची तीव्रता फार मोठी असून धुराचे लोट नजरेस पडतात. त्यातच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईमुळे वन्यप्राणी लोकवस्तीत शिरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.या वणव्यांमुळे तालुक्यातील जंगलात आढळणारे रानडुकरे, भेकर, ससे, कोल्हे, साळीदर, पोपट, मोर यासह खारींच्या जाती नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच या वणव्यांमुळे वरकस भागात मोठ्या प्रमाणात लागवड केलेल्या आंबा, काजू आदी फळबागांची व शेतीची हानी झाल्यास नुकसानभरपाई देण्याबाबत वनविभागाकडे कोणतीही तरतूद नसल्याचे सांगण्यात आले आहे. शहरालगत कळसगिरीचा माथा ही उन्हाळ्यात नेहमी पेटलेलाच दिसून येतो. सुकेळी येथे लागणाऱ्या वणव्याची तीव्रता फार मोठी असते. मागे खांबच्या जंगलात सतत ८ दिवस आगीचे लोट दिसून येत होते. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही हा धुरांडा सहन करीत प्रवास करावा लागत होता. वणवे लागलेल्या बहुतांशी ठिकाणी जंगल गावानजीक असल्याने ग्रामस्थांनी धसका घेतला आहे.
वणव्यांमुळे वनसंपदेची हानी
By admin | Published: May 13, 2016 2:37 AM