देहरंग परिसर अजूनही ‘बेरंग’च
By admin | Published: July 20, 2015 02:44 AM2015-07-20T02:44:25+5:302015-07-20T02:44:25+5:30
माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या देहरंग धरणाच्या परिसराचे सुशोभीकरण करून येथे पर्यटनस्थळ विकसित करण्याचा प्रस्ताव धूळखात पडून आहे.
पनवेल : माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या देहरंग धरणाच्या परिसराचे सुशोभीकरण करून येथे पर्यटनस्थळ विकसित करण्याचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. पालिकेने याकडे दुर्लक्ष केले असून, पाठपुरावा न झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप स्थगिती उठविण्यात आलेली नाही. परिणामी देहरंग परिसर बेरंगच राहिला आहे.
पनवेल नगरपरिषदेच्या मालकीची २७७ एकर जमीन असून, त्यातील काही क्षेत्रावर देहरंग धरण आहे. जलाशयाच्या खालच्या बाजूला सुमारे १०० एकर जमीन विकसित करण्याजोगी आहे. म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी १७ जुलै २००३ रोजी विशेष सभा घेऊन ही जागा बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर लगेचच खासगी एजन्सींकडून निविदाही मागविण्यातही आल्या. याकरिता तीन मोठ्या एजन्सींनी अर्ज दाखल केले होते. परंतु जयंत पगडे यांनी २८ आॅक्टोबर २००५ रोजी या ठरावाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करीत स्थगिती आणली. त्यामुळे देहरंग धरण परिसराच्या सुशोभीकरणाचा प्रस्ताव रखडला.
पनवेल नगरपालिकेच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याने याबाबतची स्थगिती उठविण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पनवेल पालिकेकडूनही या प्रकल्पाकरिता फारशी उत्सुकता दाखविण्यात आली नाही.