पनवेल : पनवेल महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या शिवप्रेरणा श्रमिक कामगार संघटनेमार्फतसोमवारी संप पुकारण्यात आला. त्यामुळे शहरातील घंटागाडी, स्वच्छता, ड्रेनेज दुरु स्ती व सफाई, पाणी सोडणारे की किपर्स, खोदकाम, फवारणी आदी विभागाचे कंत्राटी कामगार संपावर गेले होते.कामगारांना वाढीव वेतन, पीएफ, ईएसआयसी यासारख्या मूलभूत सुविधा व अधिकार, तसेच आजपर्यंत न दिला गेलेला पीएफ, किमान वेतनातील फरक याकरिता संघटनेने वेळोवेळी कंत्राटदार व महापालिकेत पाठपुरावा करून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. कंत्राटदार व महापालिकेने विशेष दखल घेऊन ठोस पावले न उचलल्याने कामगारांनी संप पुकारून पालिकेवर धडक दिली. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने महापौर डॉ. कविता चौतमोल यांची भेट घेतली. त्यानंतर संयुक्तिक बैठक आयोजित केली. या बैठकीस संघटनेचे सल्लागार तथा शहरप्रमुख प्रथमेश सोमण, संघटनेचे अध्यक्ष अनित गागडा, सेनेचे इतर पदाधिकारी तसेच महापालिकेतर्फे महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर चारु शीला घरत, भाजपा गटनेते परेश ठाकूर, उपायुक्त जमीर लेंगरेकर तसेच इतर अधिकारी, संबंधित कंत्राटदार व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत आश्वासक तोडगा निघाला. महिन्याभराच्या अवधीत या सर्व समस्या निकालात निघतील, असे आश्वासन महापौर व उपायुक्त यांनी दिले. तसेच सर्व ठेकेदारांना आवश्यक सुविधा व किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
स्वच्छतेचा बोजवारा : पनवेलमध्ये कामगारांचा संप, रस्त्यावर कच-याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 4:55 AM