बेलापूर आयटीआयची दैना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 06:55 AM2017-08-07T06:55:30+5:302017-08-07T06:55:30+5:30
बेलापूरमधील आयटीआयची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नवीन इमारतीचा वापर करण्यात येत नाही. जुन्या इमारतीला खुराड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील गैरसोयी दूर करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : बेलापूरमधील आयटीआयची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. नवीन इमारतीचा वापर करण्यात येत नाही. जुन्या इमारतीला खुराड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. येथील गैरसोयी दूर करण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नवी मुंबईमधील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी बेलापूरमध्ये आयटीआय सुरू करण्यात आला आहे. परंतु येथील इमारत व परिसराची दुरवस्था झाली आहे. आयटीआयचे मुख्य प्रवेशद्वार बंद आहे. मागील बाजूने आयटीआयमध्ये प्रवेश करावा लागत आहे. आयटीआयसाठी नवीन इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे, परंतु त्याचा अद्याप वापर करण्यात येत नाही. विद्यार्थ्यांसाठी उपाहारगृह नाही. वर्कशॉपची अवस्था बिकट झाली आहे. संरक्षण भिंतीची पडझड झाली असून ती कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. नवीन इमारतीच्या बाजूला खोदकाम करण्यात आले असून गटारातील पाण्याचा निचरा होत नाही. पाणी साचून राहिल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. विद्यार्थ्यांना खुराड्यात कोंबल्याप्रमाणे वर्गात बसविले जात आहे. युवा सेनेचे बेलापूर मतदार संघाचे उप विधानसभा युवा अधिकारी निखिल रतन मांडवे, सिद्धाराम शिलवंत, प्रवीण कांबळे, सुशील सुर्वे, अजित खताळ, मनोज जाकते, सचिन कवडे, सुनील सानप, मनोज डोंगरे, अजय गरड, साईश जाधव आदींनी आयटीआयच्या प्राचार्यांना निवेदन दिले आहे. आयटीआयमधील गैरसोयी ५ सप्टेंबरपूर्वी दूर केल्या नाहीत तर आयटीआयला टाळे ठोकण्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला आहे.