कोरोना चाचणीसाठीचा विलंब ठरतोय जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 12:29 AM2020-06-12T00:29:49+5:302020-06-12T00:29:56+5:30
सर्वाधिक श्रीमंत महापालिकेची कंजुसी, अहवालासाठी ४ ते ८ दिवसांची प्रतीक्षा
नामदेव मोरे ।
नवी मुंबई : कोरोना चाचणीसाठी लागणारा विलंब शहरवासीयांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. खाजगी लॅबमधून २४ तासांमध्ये अहवाल दिला जात असताना मनपाच्या माध्यमातून चाचणी केल्यानंतर ४ ते ८ दिवस अहवाल मिळत नाही. काही रुग्णांना दहा दिवस विलंब लागल्याचेही निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. चाचणीसाठी शासनावर अवलंबून न राहता स्वत:ची लॅब उभी करावी किंवा खाजगी लॅबकडून चाचण्या करून घ्याव्यात, अशी मागणी होत आहे.
नवी मुंबईमधील कोरोनाची स्थिती गंभीर होऊ लागली आहे. गुरुवारी एकाच दिवशी १९५ रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या तब्बल ३,४१४ झाली आहे. एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाला असून कोरोना बळींची संख्या १०७ झाली आहे. नवी मुंबईसारख्या सुनियोजित शहरामध्ये कोरोनाचा सुरू असलेला हाहाकार थांबविण्यात प्रशासनाला अपयश येऊ लागले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ठोस निर्णय घेतले जात नसल्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयितांची तत्काळ चाचणी होणे आवश्यक असून २४ तासांमध्ये चाचणीचा अहवाल मिळणे आवश्यक आहे. परंतु याच्या उलट स्थिती शहरात सुरू आहे. खाजगी लॅबमधून चाचणी केली तर २४ तासांमध्ये अहवाल मिळत आहे. परंतु महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्यासाठी ४ ते ८ दिवसांचा विलंब होत आहे. वेळेत अहवाल न मिळाल्यामुळे व सर्व संशयितांना तत्काळ क्वारंटाइन केले जात नसल्याने त्यांच्यापासून प्रसार वेगाने होत आहे.
सीवूड व ऐरोलीमधील तीन रुग्णांचे निधन झाल्यानंतर पाच दिवस त्यांचा अहवाल मिळाला नव्हता. वाशीमध्येही वेळेत उपचार झाले नाहीत. स्वॅब घेतल्यानंतर रुग्णालयात फोन करून अहवालासाठी पाठपुरावा करीत आहेत. अनेक जण माजी नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधींना फोन करून अहवाल लवकर मिळावा यासाठी पाठपुरावा करीत आहेत. लोकप्रतिनिधींनी फोन केल्यानंतरही शासनाने नेमून दिलेल्या लॅबकडूनच अहवाल उशिरा येत असल्याचे सांगितले जात आहे. नवी मुंबईमध्ये यापूर्वीच महापालिकेने स्वत:ची लॅब उभी करणे आवश्यक होते. परंतु त्यासाठी वेळेत परवानगी मिळाली नसल्यामुळे लॅबसाठी अजून दहा दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मनपाने खाजगी लॅबच्या माध्यमातून तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सर्वाधिक श्रीमंत महापालिकेची कंजुसी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर तेथील प्रशासनाने खाजगी लॅबबरोबर चाचणीसाठी करार केला आहे. एपीएमसी कर्मचारी, सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार व इतरांची चाचणी या लॅबच्या माध्यमातून केली जात असून २४ तासांमध्ये अहवाल उपलब्ध करून दिला जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका राज्यातील श्रीमंत महानगरपालिका आहे. मनपाकडे मुबलक निधी असताना जनतेसाठी खाजगी लॅबमधून तपासणी का करून घेतली जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी २४ तासांत स्वॅब चाचणीचा अहवाल उपलब्ध करून देणारी यंत्रणा उभी करण्याची मागणी केली जात आहे. यासाठी कितीही पैसे लागले तरी खर्च करावेत, अशी मागणी केली जात आहे.
मास स्क्रीनिंगचा मुलामा : महानगरपालिका कार्यक्षेत्रात मास स्क्रीनिंग मोहीम राबविली जात आहे. माजी नगरसेवक व इतर राजकीय पक्षही मास स्क्रीनिंगची मागणी करीत आहेत. या शिबिरामध्ये फक्त तापमान व आॅक्सिजन तपासणी होत आहे. कोरोनाचे संशयित शोधण्यासाठी मास स्क्रीनिंगचा मुलामा लावण्यापेक्षा रुग्णालयात उपचारासाठी संशयितांची कोरोना चाचणी केली जावी व रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तीचीही तपासणी केली जावी. तपासणी केल्यानंतर अहवाल तत्काळ उपलब्ध करून द्यावा, अशी प्रतिक्रिया जाणकारांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईत कोरोना चाचणीचा अहवाल लवकर मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या लॅबबरोबर मेट्रोपोलीसच्या माध्यमातूनही तपासणी सुरू केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये स्वत:ची लॅबही सुरू करण्यात येणार आहे.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
नवी मुंबईमधील कोरोना सद्य:स्थिती
एकूण तपासणी १४,२७३
पॉझिटिव्ह ३,४१४
निगेटिव्ह १०,४१४
प्रलंबित ४४३
मृत्य १०७
उपचार सुरू १,३०९
कोरोनामुक्त १,९९८
होम क्वारंटाइन ९,२४५
क्वारंटाइन पूर्ण ३०,४२६