लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : ग्रामीण भागात काम करण्यास अनेकांची तयारी नसते. त्यातच ग्रामसेवकावर एका ग्रामपंचायतीपेक्षा अनेक ग्रामपंचायतींची जबाबदारी असते. अनेक गावात ग्रामसेवक हजर राहात नसल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विकासकामांचा खोळंबा वाढला आहे. हे टाळण्यासाठी ग्रामसेवकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबावे. यात कसूर झाल्यास त्यांना निलंबित करण्याबाबत तक्रार केली जाते. यामुळे अधिकारीवर्गाला नाहक त्रास होतो तसेच तालुक्याच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यापुढे ग्रामसेवकांबाबत कोणी तक्रारी केली अथवा कामात अडथळा निर्माण केल्यास चौकशी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रत्येक पंचायत समितीला पत्राद्वारे कळविण्यात आले.
सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्या त्या गावांतील ग्रामसेवकांवर असते. परंतु ग्रामसेवक त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, अनेक कामे अपूर्ण राहतात. ती मुदतीत पूर्ण होत नाही. ग्रामसेवकांविरुद्ध ग्रामीण भागात तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. तसेच काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच तर सदस्य स्वतःच्या फायद्यासाठी ग्रामसेवकाला वेठीस धरत असून, दबावतंत्र टाकून कामात विघ्न निर्माण करतात तर काही ठिकाणी ग्रामसेवक इतरांचे ऐकून चुकीच्या कामाला खतपाणी घालत असल्याचे प्रकार कर्जत तालुक्यात दिसून येत आहेत. तसेच सरपंच प्रामाणिक काम करीत असून, अनेक सदस्यांना अथवा ग्रामसेवकाचा फायदा होत नाही म्हणून ग्रामसेवकाला हाताशी धरून मासिक सभेत गोंधळ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचप्रमाणे संबंधिताना निलंबित करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मदत घेऊन खोट्या केसेस केल्या जात असल्याचे प्रकार घडले आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये लोकप्रतिनिधी स्वतःच्या सोयीनुसार ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक निवडतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडचणी निर्माण होत आहे. तसेच ग्रामसेवकाला एका ग्रामपंचायतीचा ताबा दिला पाहिजे, जेणेकरून ग्रामसेवकाला ग्रामस्थांचे प्रश्न सोडविता येतील तर आणि कामकाजामध्ये वेळ देता येईल, यावर विचारविनिमय झाला पाहिजे. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः प्रत्यक्षात येऊन पाहणी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
ग्रामसेवकाला त्यांच्या नियमाप्रमाणे काम करून दिले पाहिजे तसेच ग्रामसेवकांनी आपले अधिकार, शासनाने दिलेले अधिकाराप्रमाणे नियमात राहून काम केले पाहिजे. चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालू नये. - बालाजी पुरी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती