अहवालासाठी चार तास रखडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 01:32 AM2021-03-09T01:32:45+5:302021-03-09T01:33:15+5:30
नेरूळ रुग्णालयातील प्रकार; आयुक्तांनी आदेश देताच दोन मिनिटांत दिला अहवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोना चाचणी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची मनमानी सहन करावी लागत आहे. रविवारी नेरूळ मधील माँसाहेब मीनाताई ठाकरे रूग्णालयात अँटिजेन चाचणी केल्यानंतर अहवाल सांगण्यासाठी चार तास रखडविण्यात आले. विनंती करूनही कर्मचारी दाद देत नसल्याने मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निदर्शनास सदर प्रकार आणून देण्यात आला. आयुक्तांनी आदेश देताच दोन मिनिटात अहवाल देण्यात आला.
नवी मुंबई मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर व इतर अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत. परंतु आरोग्य विभागातील काही कर्मचारी मात्र तपासणी व उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांशी योग्य प्रकारे वर्तन करत नसल्याच्या तक्रारीही येऊ लागल्या आहेत. रविवारी नेरूळ मधील माँसाहेब मीनाताई ठाकरे रूग्णालयात कोरोना चाचणीसाठी गेलेल्या नागरिकांना अहवाल देण्यासाठी रखडविण्यात आले. सकाळी साडेदहा वाजता काही नागरिकांनी चाचणी केली. एक तास वाट पाहिल्यानंतरही अँटिजेन चाचणीचा अहवाल मिळाला नाही. यामुळे सदर नागरिक अल्पोपहार घेण्यासाठी गेले. पुन्हा आल्यानंतर अहवालासाठी विचारणा केली पण काहीच माहिती देण्यात आली नाही. दीड वाजता कर्मचाऱ्यांची जेवणासाठी सुट्टी झाली. यानंतर संबंधित नागरिकही जेवण करून आले. पुन्हा अहवालाविषयी विचारणा केली पण अहवाल देण्यात आला नाही. अहवाल देणारे आले की सांगतो अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. अँटिजेन चाचणीचा अहवाल अर्ध्या तासात मिळणे अपेक्षित आहे. परंतु चार तास रखडविण्यात आल्याने नागरिकांनी थेट आयुक्त अभिजीत बांगर यांच्याशी संपर्क साधला. आयुक्तांनी तत्काळ दखल घेऊन आरोग्य अधिकाऱ्यांना याविषयी माहिती घेण्यास सांगितले. आयुक्तांनी व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी दखल घेताच तत्काळ दोन मिनिटात अहवाल देण्यात आला.
सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन
नेरूळ मधील माँसाहेब मीनाताई ठाकरे रूग्णालयात रविवारी कोरोना चाचणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. सकाळी व्यवस्थित चाचण्या होत होत्या. पण जेवणाच्या वेळेनंतर चाचणीच्या टेबलाभोवती रूग्णांनी गर्दी केली होती. अनेकांनी मास्क हनुवटीवर लावले होते. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सदर ठिकाणी कोरोना पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती.
सुरक्षा कर्मचाऱ्यांची अरेरावी
नेरूळ रूग्णालयात चाचणीसाठी आलेल्या नागरिकांकडून अर्ज भरून घेतला जातो. सदर अर्ज सुरक्षा रक्षकाकडे द्यावा लागतो. सुरक्षा रक्षक केसपेपर काढून चाचणीसाठी बसलेल्या डाॅक्टरांकडे देतात. रविवारी कर्तव्यावर असलेले सुरक्षा रक्षक नागरिकांशी उद्धट वर्तन करत असल्याचे पहावयास मिळाले. चाचणी करणाऱ्या महिला डाॅक्टर मात्र प्रत्येक नागरिकाशी सौजन्याने वागत असल्याचे पहावयास मिळाले.