अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्याकरिता पनवेल महापालिकेने आॅनलाइनची सोय केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात सोयीस्कर झाले असले तरी सिडकोकडून मात्र हेलपाटे मारायला लावले जात आहे. विभागीय कार्यालयातून ते सिडको भवन असा फाईलींचा प्रवास होत असल्याने या प्रक्रियेला विलंब लागतो त्यामुळे मंडळांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सिडकोने एकाच ठिकाणी ही सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
महापालिका हद्दीतील मंडळांच्या वतीने मंडप टाकण्याबरोबर डेकोरेशन, देखावे उभारले जातात. याकरिता स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण, स्थानिक पोलीस, वाहतूक विभागाची परवानगी घ्यावी लागते. याकरिता संबंधित कार्यालयांमध्ये खेटा माराव्या लागतात. अनेकदा मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अडवणूक सुद्धा केली जाते, तसेच परवानगी ना हरकत देण्यासाठी विलंब लावला जातो. या सर्व गोष्टींचा विचार करून गेल्या वर्षीपासून पनवेल महापालिकेने मंडळांना आॅनलाइन परवानग्या देण्यास सुरुवात केली. पालिकेने तयार केलेल्या पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर त्यांचे आॅनलाइन व्हेरीफिकेशन केले जाते. त्यानंतर त्वरित परवानगी दिली जाते. त्याकरिता धर्मदाय आयुक्तांकडील नोंदणी प्रमाणपत्र, स्थळदर्शक नकाशा आणि जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. सिडको वसाहतीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सिडकोकडे एक महिना अगोदरच अर्ज केला जातो. मात्र हा अर्ज सहायक वसाहत अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयाकडे जातो. त्यानंतर बेलापूर येथील सिडको भवनला ही फाईल जाते. त्या ठिकाणी सुद्धा तीन ते चार टेबल फिरल्यानंतर परवानगी दिली जाते. मात्र त्याकरिता वेळ खर्ची पडत असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.सिडकोमध्ये सुद्धा एकाच ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे आणि त्या ठिकाणी परवानगी दिली जाते. मात्र ज्या भूखंडावर गणेशोत्सव साजरा करायचा आहे त्या ठिकाणी माहिती घ्यावी लागते. तसेच हा भूखंड आणखी कोणाला कार्यक्र माकरिता दिला आहे का याचीही चाचपणी करावी लागते.- टी. एल. परब,वसाहत अधिकारी, सिडकोगेल्या वर्षी गणेशोत्सव सुरू झाला तरी अनेकांना सिडकोकडून परवानगी मिळाली नव्हती. प्राधिकरणाकडून मंडळाच्या पदाधिकाºयांची अडवणूक केली जाते. मानसिक त्रास जास्त होतो. याबाबत कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही, यंदाही तीच परिस्थिती आहे.- चंद्रकांत राऊत,रोडपालीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवएक खिडकी फक्त बैठकीपुरती असते. त्यानंतर सर्व कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. महापालिकेकडून आॅनलाइन सुविधा करण्यात आली असली तरी सिडकोमध्ये दहा ते पंधरा फेºया माराव्या लागतात. त्यांची नाहरकत जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इतरांकडून परवानग्या दिल्या जात नाही.- सीता सदानंद पाटील, अध्यक्षा,खांदेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव