मंदिरे हटवा, पानटपऱ्या वाचवा मोहीम

By admin | Published: January 26, 2017 03:37 AM2017-01-26T03:37:53+5:302017-01-26T03:37:53+5:30

सिडको व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गरजेपोटी बांधलेल्या घरांपासून धार्मिक स्थळांपर्यंत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे

Delete Temples, Save the Pantaparai Campaign | मंदिरे हटवा, पानटपऱ्या वाचवा मोहीम

मंदिरे हटवा, पानटपऱ्या वाचवा मोहीम

Next

नामदेव मोरे / नवी मुंबई
सिडको व महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने गरजेपोटी बांधलेल्या घरांपासून धार्मिक स्थळांपर्यंत बांधकामांवर कारवाई सुरू केली आहे. मंदिरांवर कारवाई करणारी पालिका बार व इतर हॉटेलबाहेरील अनधिकृत पानटपऱ्या वाचविण्यासाठी धडपडत आहे. शहरात अनधिकृत टपऱ्या भाड्याने देण्याचा व्यवसाय तेजीत असून ५ ते २५ हजार रुपये मासिक भाडे आकारले जात आहे. या अर्थकारणामुळेच आरोग्याला घातक पान, विडी व अवैध गुटखा विक्री करणाऱ्या या टपऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अवैध बांधकामांवर कारवाई केली जात असून या मोहिमांसाठी प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्रशासनाकडून पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या धडक मोहिमा सुरू असून किती ठिकाणी कारवाई केली याचा आढावाही वेळोवेळी प्रसिद्ध केला जात आहे. पण प्रशासनाकडून करण्यात येणारा दावा व शहरातील वास्तव यामध्ये फरक आढळू लागला आहे. अतिक्रमणावर कारवाई करताना पक्षपातीपणा केला जात आहे. समाजाला घातक ठरणाऱ्या व अवैध व्यवसाय करणाऱ्यांची बांधकामे पाडली जात नाहीत व त्यांचे साहित्यही जप्त केले जात नाही. यामध्येच पानटपऱ्यांचाही समावेश आहे. प्रत्येक हॉटेलच्या बाहेर अतिक्रमण करून पानविडी विक्रीचा स्टॉल सुरू करण्यात आलेला आहे. यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली जात नाही. पूर्णपणे अनधिकृत असलेल्या या टपऱ्या हटविल्या जात नाहीत. यामध्ये मोठे अर्थकारण दडलेले आहे. अनेक महत्त्वाच्या हॉटेलच्या बाहेरील पानटपऱ्यांचे भाडे महिन्याला २५ हजार रुपयांपर्यंत आहे. यामध्ये वाशी सेक्टर १७, नेरूळ, एपीएमसी व इतर ठिकाणच्या हॉटेलचा समावेश आहे. छोट्या हॉटेलच्या बाहेरील स्टॉललाही किमान पाच हजार रुपये भाडे आकारले जात आहे.
अनधिकृत पानटपऱ्या या शहरवासीयांच्या आरोग्यालाही घातक आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई असली तरी हॉटेलच्या बाहेर बिनधास्तपणे धूम्रपान सुरू असते. गुटखा बंदी असतानाही दुप्पट ते पाचपट दराने गुटख्याची विक्री केली जात आहे. शहरातील अनेक पानटपऱ्यांवर गांजा व इतर अवैध गोष्टींचा व्यवसाय होत असल्याचे यापूर्वीच पोलिसांनी केलेल्या कारवाईमधून निदर्शनास आले आहे. तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करण्यास मनाई आहे. पण नवी मुंबईतील ९५ टक्के पानटपऱ्यांवर विडी, सिगारेट व इतर कंपन्यांच्या जाहिरातीचे स्टिकर लावण्यात आले आहेत.
अनेक पानटपऱ्यांवर नामफलक सिगारेट कंपन्यांनी बनवून दिले आहेत. त्यासाठी टपरीचालकांना ५ ते १० हजार रुपये भाडेही दिले जात आहे. शहरातील मंदिर, झोपडी, फेरीवाले यांच्यावर कारवाई होत असताना अनधिकृत टपऱ्यांना अभय का व कोणाचे, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

Web Title: Delete Temples, Save the Pantaparai Campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.