अनधिकृत डम्पिंग ग्राउंड हटवा, शेकापची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 04:46 AM2018-10-06T04:46:08+5:302018-10-06T04:46:33+5:30
शेकापची मागणी : उद्यान विकसित करण्याची सूचना
पनवेल : पनवेल शहरात गुजराती स्मशानभूमीजवळ असलेल्या जागेवर महापालिकेकडून बेकायदेशीरपणे कचरा डम्प केला जात आहे. ठेकेदाराकडून अनेक वर्षांपासून कचरा टाकला जातो. येथील डम्पिंग ग्राउंड हटवून, तेथे उद्यान विकसित करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.
पनवेल महापालिकेने बडतर्फ केलेल्या ठेकेदाराची कचरा गोळा करणारी पडिक वाहनेही या ठिकाणी लावण्यात आलेली आहेत. काही वर्षांपूर्वी या भागात चिन्मय गौरांग हे रहिवासी संकुल विकसित करण्यात आले आहे, त्यामुळे या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कचरा साठवणूक आणि वाहनांच्या वर्दळीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. डम्पिंगमुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. मार्केट यार्ड परिसराच्या निवांत बाजूला असलेल्या या भागात इतरही आक्षेपार्ह घटना घडत आहेत. गर्दुल्ल्यांचा वावरही वाढत चालला आहे. बेकायदेशीर दारूविक्र ी केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. या साºया गोष्टींचा त्रास येथे आजूबाजूला राहणाºया रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
पनवेल महापालिकेने येथे राहत असेलेल्या शेकडो नागरिकांचा विचार करून हे बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड हटविण्याची गरज आहे. अनेक वर्षांपासून साठवलेला कचरादेखील हटविण्यात आला. मात्र, स्वच्छता अभियान संपल्यानंतर त्याचे पुढे काहीच झाले नाही, पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे हा बेकायदेशीर डम्पिंग ग्राउंड बंद करून गाढी नदीकाठच्या परिसरात चांगले उद्यान विकसित केले तर इथली दुर्गंधी दूर होऊन विरंगुळा केंद्र निर्माण होऊ शकते. त्यामुळे महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या या जागेचा योग्य वापर होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल.
गुजराती स्मशानभूमीजवळील डम्पिंग ग्राउंड हटवून त्याजागी उद्यान विकसित करावे. जेणेकरून इथली दुर्गंधी दूर होऊन विरंगुळा केंद्र निर्माण होऊ शकते.
- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका