नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदार संघात १०० कोटी वाटले. आत्ताही मुंबईसह राज्य लुटण्यासाठी दिल्लीश्वरांना महाराष्ट्राची सत्ता हवी आहे. येथील उद्योग पळविले जात आहेत. पैशांचे राजकारण व सत्तेचा दुरूपयोग करणारांना धडा शिकविण्याची गरज असल्याचे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी भवनमध्ये आयोजीत सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत हाेते. राज्यातील उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. मुंबई महानगरपालिकेची कामे गुजराती ठेकेदारांना देण्याचे राजकारण केले जात आहे. मुंबईसह संपूर्ण राज्य लुटण्यासाठीच दिल्लीश्वरांना सत्ता हवी आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेचा दुरूपयोग करत आहे. सर्वत्र पैशांचे राजकारण केले जात आहे. लोकसभेच्यावेळी एका मतदार संघासाठी १०० कोटी रूपये खर्च केले. साताराला ७० ते ८० हजार मते ३ ते ४ हजार रुपये देवून खरेदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
सत्तेचा दुरूपयोग करणारांना जनता कंटाळली आहे. महाविकास आघाडीला प्रतिसाद वाढत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात नक्की परिवर्तन होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये येणारांची संख्या वाढत आहे. या निवडणुकीमध्ये सातारावासीयांनी एकजुट होऊन सहकार्य करा. सर्वांनी गावी येवून परिवर्तन घडविण्यासाठी सहकार्य करा. मुंबईतील सातारकर एकवटला की परिवर्तन घडतेच हे आपण यापुर्वी अनुभवले आहे. कोरेगावसह सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार आपणास निवडूण आणायचे आहेत.
मुंबईकरांनी गावोगावी जावून निवडणूक हाती घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले. आतापर्यंत शरद पवार यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी पुर्ण क्षमतेने पेलण्याचा प्रयत्न केला. यापुढेही एकनिष्ठपणे काम करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष सी. आर. पाटील, मंगेश आमले, माथाडी नेते गुलाबराव जगताप, एकनाथ जाधव यांच्यासह सातारा, कोरेगाव मधील नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.