- वैभव गायकर
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या पायरीवर एका महिलेची प्रसुती झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४.४५ च्या सुमारास घडली .अनीला समीर ठाक (२२) असे या महिलेचे नाव आहे .
प्रसूतीच्या वेदना होत असल्याने अनिला आपल्या पतीसाठी जिल्हा रुग्णालयात येण्यास निघाले दरम्यान ज्या रिक्षाने त्या उपजिल्हा रुग्णालयात येण्यास निघाल्या त्या रिक्षा चालकाला पालिका रुग्णालयात रिक्षा घेऊन चला असे या ठाक दाम्पत्यांनी सांगितले .रिक्षा चालकाला देखील याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने रिक्षा चालकाने रिक्षा थेट पालिका मुख्यालयाजवळ आणला दरम्यान मुख्यालयात उतरताच क्षणी पायऱ्यांवर चढताना अनिला ठाक यांच्या प्रसूती वेदना तीव्र झाल्याने काही क्षणातच अनीलाने पायरीवरच एका मुलीला जन्म दिला . मुख्यालयातील कर्मचारी व सुरक्षा रक्षकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला माहिती दिली .मात्र रुग्णवाहिकेतिल वाहन चालक जागेवर नसल्याचे समजले .यावेळी काही कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना याबाबत माहिती मिळताच डॉक्टर व परिचारिकेने घटनास्थळी धाव घेतली .
दरम्यान डॉक्टरांनी त्वरित जन्मलेल्या बाळाची नाळ कापून आई व बाळाला त्वरित रुग्णालयात हलविण्यास सांगितले . यावेळी पालिकेत सुरक्षा रक्षण म्हणून कार्यरत असलेल्या जीवन कोंडिलकर यांनी त्वरित आपल्या गाडीने नावजात मुलीला रुग्णालयात दाखल केले .मुलीच्या आईला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने त्वरित रिक्षाने उपजिल्हा रुग्णालायत दाखल केले .सध्याच्या घडीला माता बाळ दोघेही सुखरूप आहेत .महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी कुठेही रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी याकरिता शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरु केली .मात्र उपजिल्हा रुग्णालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पालिका मुख्यालयात हि रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध होवू शकली नाही .रुग्णवाहिकेत वाहन चालकच रुग्णवाहिकेत उपस्थित नसल्याने हा प्रकार घडल्याने संबंधित वाहन चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे .आम्ही त्वरित माता व बाळाला प्राथमिक उपचार सुरु केले आहेत . दोघांची तब्बेत उत्तम आहे .- डॉ नागनाथ यम्पल्ले ( वैद्यकीय अधीक्षक , उपजिल्हा रुग्णालय पनवेल )