नवी मुंबईतील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 02:17 AM2019-06-26T02:17:56+5:302019-06-26T02:18:32+5:30
महापालिकेने शहरातील १४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे
नवी मुंबई : महापालिकेने शहरातील १४ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे; परंतु त्यानंतरसुद्धा या शाळा सुरूच आहेत. अशा शाळांतून प्रवेश घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून संबंधित शाळांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधक व अत्याचार विरोधी टाईगर्स संस्थेने केली आहे.
संस्थेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी शिक्षण मंडळाचे सहायक अधिकारी धनसिंग सूर्यवंशी यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले. वाशी सेक्टर २६ येथील स्वामी विवेकानंद संस्थेची आॅरकिड इंटरनॅशनल शाळा मागील दोन वर्षांपासून अनधिकृत म्हणून जाहीर करण्यात येत आहे. मात्र, त्यानंतर सुद्धा गडगंज शुल्क आकारून शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरूच असल्याची बाब त्यांनी सूर्यवंशी यांच्या निदर्शनास आणून दिली. अनधिकृत म्हणून जाहीर करण्यात आलेल्या शहरातील सर्व शाळांतून हाच प्रकार सुरू असून याप्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळात संस्थेचे प्रदेश अध्यक्ष डॉ. संदीप तांबे, नवी मुंबई अध्यक्ष संकेत नारायण डोके, दीपक चतुर्वेदी, फय्याज शेख, अमित चौतमोल आदींचा सहभाग होता. यासंदर्भात नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सूर्यवंशी यांनी दिल्याचे डोके यांनी सांगितले.