दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
By admin | Published: September 14, 2016 04:36 AM2016-09-14T04:36:57+5:302016-09-14T04:36:57+5:30
तोंडी आदेशाव्दारे आरडीसी बँकेची चौकशी थांबविणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे.
अलिबाग : तोंडी आदेशाव्दारे आरडीसी बँकेची चौकशी थांबविणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी केली आहे. ठाकूर यांनी माहितीच्या अधिकारात या प्रकरणातील सत्य समोर आणले आहे. याप्रकरणाची चौकशी केल्यास आरडीसी बँकेवरील कारवाई थांबविण्याबाबत कोणी तोंडी आदेश दिले होते हे समोर येणार आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल सहकार विभागाच्या प्रधान सचिवांनी घेत दोषींवर कारवाई करावी, असे आदेश सहकार आयुक्तांना १२ स्पटेंबर २०१६ नुसार दिले आहेत. त्यामुळे विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, तत्कालीन विभागीय सहनिबंधक तुषार काकडे, तत्कालीन जिल्हा विशेष लेखा परिक्षक आर.डी.वाघ, लेखापरिक्षक डी.एम, खोमणे हे चौकशीच्या रडावर आले आहेत.
आरडीसी बँकेतील व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार मधुकर ठाकूर आणि भाजपाचे पनवेल येथील आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली होती. २०१५ पासून हे प्रकरण सुरु आहे. परंतु तत्कालीन विभागीय सहनिबंधक तुषार काकडे यांच्यामार्फत रायगड जिल्ह्याचे तत्कालीन विशेष लेखापरिक्षक आर.डी.वाघ यांना २४ डिसेंबर २०१५ रोजी दुरध्वनीवरुन आरडीसी बँकेवरील कारवाई थांबवावी, असे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे आरडीसी बँकेवरील कारवाई थांबविण्यात येत असल्याचे पत्र आर.डी.वाघ यांनी आरडीसी बँकेचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी यांना २८ डिसेंबरच्या पत्रान्वये दिले होते. हे पत्रच ठाकूर यांना माहितीच्या अधिकारात मिळाल्याने हे प्रकरण समोर आले आहे. काकडे यांना कारवाई थांबवावी असे तोंडी आदेश कोणी दिले होते. हे समोर आणण्यासाठी प्रकरणाची सखाले चौकशी केली पाहीजे, अशी मागणी माजी आमदार ठाकूर यांनी केली. काकडे यांना मंत्रालयातून आदेश दिले होते. त्यामुळे काकडे यांनी तेच तोंडी आदेश जिल्हास्तरावरील अधिकारी वाघ यांना दिले. त्यामुळे तोंडी आदेशाचे पालन करणारे दोषी असल्याचे मत ठाकूर यांनी व्यक्त केले.