नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल परिसरात बेकायदा पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुरू असून त्यावर कारवाईची मागणी होत आहे. त्याठिकाणी नागरिकांच्या चाचणीचा अहवाल तोतया पॅथॉलॉजिस्टच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून प्रमाणित केल्या जात आहेत. अशा पॅथॉलॉजिस्टवर कारवाईची मागणी संघटनेकडून होत आहे.महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग फोटोलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट या संघटनेने ही मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नवी मुंबईसह पनवेल महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त तसेच शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडेही तक्रार केली आहे. राज्याच्या विविध भागासह नवी मुंबई व पनवेल परिसरातही मोठ्या प्रमाणात अवैध पॅथॉलॉजी लॅब चालवल्या जात आहेत. त्याठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दररोज शेकडो नागरिकांच्या रक्त, लघवीची चाचणी करून अहवाल दिला जात आहे. मात्र बोगस लॅबोरेटरीमधून दिला जाणारा अहवाल सदोष असण्याची दाट शक्यता असते. महाराष्टÑ वैद्यकीय परिषदेकडे नोंदणीकृत नसलेल्या व्यक्तीला तज्ज्ञ भासवून त्यांच्या डिजिटल स्वाक्षरीद्वारे हे अहवाल प्रमाणित केले जातात. प्रत्यक्षात मात्र ते लॅबमधीलच एखाद्या कर्मचाऱ्याकडून तपासलेले असतात. त्यामुळे आवश्यक बाबी चुकीच्या नोंदवल्या गेल्यास रुग्णाला त्याच्या जीवाला धोका उद्भवू शकतो. त्यामुळे सर्व महापालिकांच्या आरोग्य विभागाने पॅथॉलॉजी लॅबोरेटरींचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने गतवर्षी सूचित केले होते. त्यानंतरही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अद्यापही नवी मुंबईसह पनवेल परिसरात व राज्याच्या अनेक भागात बोगस पॅथॉलॉजी लॅब चालत असल्याचा आरोप महाराष्टÑ असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग फोटोलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजीस्टचे अध्यक्ष संदीप यादव यांनी केला आहे. त्यांच्यावर योग्य कारवाईसाठी सर्वेक्षणाचीही मागणी त्यांनी केली आहे. त्यामध्ये सर्व लॅबचालकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी व्हावी, वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसलेल्यांच्या लॅबमधील उपकरणे जप्त केली जावीत तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाईचीही मागणी त्यांनी केली आहे. याकरिता राज्यपालांसह, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासह पनवेल व नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.
अवैध पॅथॉलॉजी लॅबवर कारवाईची मागणी; तज्ज्ञाच्या डिजिटल स्वाक्षरीचा बेकायदा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 12:56 AM