जमीन हडपणाऱ्यांवर कारवाईची मागणी; तहसील कार्यालयासमोर बसले उपोषणास कुटुंबीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 01:03 AM2019-06-01T01:03:11+5:302019-06-01T01:03:25+5:30
२०१६ मध्ये रायगड जिल्हा लोकशाही दिनात अर्ज निकाली काढण्यात आला. त्यानंतर शिगवण कुटुंबीय शेतात काम करण्यासाठी गेले असता, दमदाटी व शिवीगाळ करण्यात आली.
पनवेल : पनवेल तहसील कार्यालयासमोर लाडिवली येथील भाऊ आंबू शिगवण व त्यांच्या कुटुंबीयांनी उपोषण सुरू केले आहे. जमीन हडप करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी त्यांनी हे आंदोलन सुरू केले आहे.
मौजे लाडिवली तलाठी सजा आपटा येथील सर्व्हे नंबर ३/१/ड ही मिळकत खासगी मालकीची असतानाही काही व्यक्तींनी शिगवण यांच्या कुटुंबीयांना चार वर्षांपासून दमदाटी व मारहाण करून जमीन हडपण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. संबंधितांविरोधात तक्रारी करूनही रसायनी पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप शिगवण कुटुंबीयांनी केला आहे, तसेच २०१५ मध्ये पनवेल तालुका लोकशाही दिनामध्ये अर्ज दाखल करून न्याय मागितला असता तेथेही न्याय मिळाला नाही.
२०१६ मध्ये रायगड जिल्हा लोकशाही दिनात अर्ज निकाली काढण्यात आला. त्यानंतर शिगवण कुटुंबीय शेतात काम करण्यासाठी गेले असता, दमदाटी व शिवीगाळ करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ग्रामपंचायत गुळसुंदे व इतर संबंधित अधिकारी, गटविकास अधिकारी, बांधकाम विभाग यांना पूर्वापार स्मशानभूमी रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिलेले असतानादेखील दुरु स्तीची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. २०१७ मध्ये कोकण आयुक्तांकडे केलेल्या अर्जात भाऊ शिगवण यांनी आपल्या जमिनीचे संरक्षण करावे, असे आदेश दिले.
या वेळी शेताला कुंपण घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागण्यासाठी गेलेले असताना त्यांना पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. कुंपण घालत असताना १० ते १२ जणांनी त्यांना मारहाण केली. या वेळी पोलिसांनी मारहाणीची तक्रार घेण्याऐवजी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. त्यानंतर वारंवार
ठाकूर यांच्याकडून शिगवण यांना जिवंत मारण्याच्या धमक्या येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी शेतावर जाणेच बंद केले आहे.
जमीन हडपण्यासाठी दहशत निर्माण करणाºया व्यक्तींवर कारवाई करून शेतकरी वाचवावा, ग्रामपंचायत गुळसुंदे, पंचायत समिती पनवेल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांच्या हलगर्जीपणाची चौकशी व्हावी, रसायनी पोलिसांकडून मंत्रालयीन लोकशाही दिनाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, या मागण्यांसाठी शिगवण कुटुंबीयांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे.