पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर गावांचा विकास खुंटला;सिडको-पालिकेची सुकाणू समिती स्थापन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 04:32 AM2017-11-05T04:32:38+5:302017-11-05T04:32:55+5:30
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे विलीनीकरण या पालिकेत करण्यात आले आहे. मात्र, वर्षभरात पालिकेच्या मार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे.
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेला नुकतीच वर्षपूर्ती झाली आहे. तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे विलीनीकरण या पालिकेत करण्यात आले आहे. मात्र, वर्षभरात पालिकेच्या मार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या गेल्या नसल्याने गावांचा विकास खुंटला आहे. यापूर्वी अस्तित्वात असलेली ग्रामपंचायतच बरी होती, असा सूर उमटत असल्याने गावांच्या विकासाकरिता सिडको पालिकेची सुकाणू समिती स्थापन करण्याची मागणी पनवेल तालुका विकास मंडळाच्या वतीने आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
सिडको उभारत असलेल्या दक्षिण नवी मुंबई स्मार्ट सिटी प्रकल्पात पनवेल महानगरपालिकेतील काही भागांचा समावेश आहे. मात्र, स्मार्ट सिटी उभारत असताना ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वास्तविक पाहता पनवेल महानगरपालिकेपूर्वी स्थापन झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फतही त्याठिकाणच्या स्थानिक गावांच्या विकासाकरिता पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पनवेल महानगरपालिका स्थापन झाली असली, तरी संपूर्ण पालिका क्षेत्रातील विकासाकरिता आवश्यक बजेट पालिकेकडे नाही. यापूर्वी पंचायत समिती, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती प्रस्ताव तयार करून सिडकोकडे पाठवून गावातील विकासकामे करून घेतली जात असत. मात्र, सध्याच्या घडीला पूर्णपणे बदल झाला असून, सिडको गावांच्या विकासाची जबाबदारी आपल्याकडून झटकत आहे, तर पालिकाही उदासीन असल्याचे पनवेल तालुका विकास समितीचे अध्यक्ष भरत पाटील यांनी पत्राद्वारे आयुक्तांना कळवले आहे.
स्मार्ट सिटीच्या धर्तीवर पालिका क्षेत्रातील गावामध्ये ‘स्मार्ट व्हिलेज’ ही संकल्पना राबविण्याची विनंती भरत पाटील यांनी पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.