शहरवासीयांकडून फळांची मागणी वाढली, ३ हजार टन आवक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:42 AM2019-05-07T02:42:22+5:302019-05-07T02:42:56+5:30

मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे.

 Demand for fruits from the city dwellers | शहरवासीयांकडून फळांची मागणी वाढली, ३ हजार टन आवक

शहरवासीयांकडून फळांची मागणी वाढली, ३ हजार टन आवक

Next

नवी मुंबई - मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे. रमजानमुळे पुढील एक महिना आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
तीव्र उकाड्यामुळे शहरवासी हैराण झाले आहेत. शहरातील तापमान ३३ ते ४० अंशावर गेले आहे. उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. यामुळे काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. एक महिन्यापासून फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. रोज कोकणसह दक्षिणेतील राज्यांमधून तब्बल ८०० ते १६०० टन आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. गत आठवड्यामध्ये एकाच दिवशी सव्वालाख पेट्यांची आवक झाली होती.
होलसेल मार्केटमध्ये २०० ते ५०० रुपये दराने हापूस आंब्याची विक्री होत असून इतर आंबा ३० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. उन्हाळ्यामुळे कलिंगडाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागामधून व इतर राज्यांमधून रोज ५०० ते ६०० टन कलिंगडाची आवक सुरू आहे. होलसेल मार्केटमध्ये ८ ते १३ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. मोसंबी व संत्रीचीही जवळपास २०० टन आवक सुरू आहे. खरबुजालाही शहरवासीयांकडून मागणी वाढत असून जवळपास १५० टन आवक रोज होत आहे.
रमजानच्या महिन्यामध्ये फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. पुढील एक महिना मार्केटमधील आवक अजून मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. कलिंगड, खरबूज व आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे. देशभरातून मार्केटमध्ये फळांची आवक होत आहे. विदेशामधूनही या तीन वस्तूंना मोठी मागणी असून आखाती देशामधील निर्यात या महिन्यात दुपटीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एपीएमसीमध्ये फळांची आवक वाढू लागली आहे. पुढील एक महिना आंब्यासह कलिंगड, खरबूज व इतर फळांना मागणी जास्त असणार आहे. आखाती देशांमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.
- संजय पानसरे,
व्यापारी प्रतिनिधी

Web Title:  Demand for fruits from the city dwellers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.