नवी मुंबई : महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना मिळालेल्या सानुग्रह अनुदानाची प्रशासन स्तरावर चौकशीची मागणी होत आहे. मंजूर झालेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम ठेकेदारांनी कामगारांना दिल्याचे काही कामगारांकडून उघड झाले आहे. यामुळे काँग्रेसच्या रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी यासंबंधीची तक्रार पालिका आयुक्तांकडे केली आहे.महापालिकेच्या कामगारांची दीपावली अधिक सुखद व्हावी याकरिता प्रशासनातर्फे त्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते. यानुसार दीपावलीपूर्वी झालेल्या महासभेत सानुग्रह अनुदान वाटपाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. त्यामध्ये महापालिकेच्या कायम कामगारांना १५ हजार रुपये तर कंत्राटी कामगारांना ८ हजार रुपये सानुग्रह अनुदानाला मंजुरी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्षात कंत्राटी कामगारांना मंजूर रकमेपेक्षा कमी रक्कम देण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी केला आहे. तशी तक्रारही काही कामगारांनी केलेली असल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांना ८ हजार रुपये मंजूर असतानाही त्यांना ५ ते ६ हजार रुपये देवून उर्वरित रक्कम लाटण्याचा ठेकेदारांचा प्रयत्न असल्याची शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे. यामुळे कंत्राटी कामगारांना ठेकेदारांकडून वाटप झालेल्या सानुग्रह अनुदानाची प्रशासनाने चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणी सावंत यांनी पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
अनुदानाच्या चौकशीची मागणी
By admin | Published: November 25, 2015 2:03 AM