टोलनाक्यावरील वसुली थांबवण्याची मागणी; सुविधांचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 11:42 PM2019-09-13T23:42:42+5:302019-09-13T23:43:05+5:30
ऐरोली - मुलुंड मार्गाची खड्ड्यांमुळे झाली चाळण
नवी मुंबई : ऐरोली-मुलुंड मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले असल्याने त्याठिकाणावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचे नुकसान होत आहे. यानंतरही सुरू असलेली टोलची वसुली थांबवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रस्त्यावर सुविधांऐवजी गैरसोयीच मिळत असतानाही टोल का भरायचा, असा प्रश्नही त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
मुंबईला जोडणाºया नवी मुंबईतील दोन्ही मार्गाची सध्या चाळण झाल्याचे पहायला मिळत आहे. वाशी टोलनाक्यासह ऐरोलीच्या टोलनाकालगतच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून मार्ग काढत वाहने चालवावी लागत आहेत. याचा नाहक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. छोट्या-मोठ्या खड्ड्यांमध्ये कार अथवा दुचाकी आदळून त्यांचे नुकसान होत आहे. तर या मार्गाने नियमित प्रवास करणाºया अनेकांच्या वाहनांचे टायर चिरणे, एक्सल तुटणे असे प्रकार सुरुच आहेत. याचा आर्थिक फटका संबंधित वाहन मालकांना बसत आहे. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेले असतानाही, सुरु असलेल्या टोल वसुलीबाबत संताप व्यक्त होत आहे. परंतु टोल ठेकेदार कंपनीकडे यासंदर्भात प्रवाशांनी तक्रार केल्यास, पावसामुळे खड्डे पडत असल्याची कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे नागरिकांकडून अधिकच संताप व्यक्त होत आहे.
कामानिमित्ताने मुंबईत जाण्यासाठी ऐरोली टोलनाका मार्गाचा वापर करावा लागतो. खड्ड्यांमुळे कारचे मोठे नुकसान होत आहे. टायरला भेगा पडत असून, हादºयाने एक्सेल तुटत आहेत. याचा आर्थिक फटका बसतो आहे. त्यामुळे खड्डे बुजवले जात नाहीत तोपर्यंत टोलची वसुली थांबवण्यात यावी. - किरण पाटील, प्रवासी