पनवेल : सिडकोमार्फत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून कळंबोलीमधील जुन्या फेरीवाल्यांची नोंद सिडकोने करून घेतली आहे. मात्र, त्यानंतरही फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत असून ते अन्यायकारक आहे. पोलिसांनी फेरीवाल्यांवर कारवाईसाठी बंदोबस्त देताना सिडकोकडून स्पष्ट माहिती घ्यावी, त्यानंतरच पोलीस बळ पुरवावे, अशी मागणी कळंबोली हातगाडी फेरीवाला सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली. कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पोपेरे यांना निवेदन देऊन फेरीवाल्यांवर होणारा अन्याय थांबविण्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. कळंबोली हातगाडी फेरीवाला सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अनिल नाईक, रामदास शेवाळे, शहरातील फेरीवाले या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिडकोमार्फत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी योग्यरीत्या करण्यात आली नाही. या योजनेंतर्गत नोंदणीकृत फेरीवाल्यांना नोंदणी क्रमांकही देण्यात आले असले तरी फेरीवाल्यांवर कारवाई करणे अयोग्य आहे. यासंदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांची भेट घेणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. सिडकोमार्फत जोपर्यंत या धोरणाची अंमलबजावणी योग्यरीत्या होत नाही तोपर्यंत पोलिसांनी कारवाईला पोलीस बळ पुरवू नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)
फेरीवाल्यांवरील अन्याय थांबविण्याची मागणी
By admin | Published: November 16, 2016 4:49 AM