महानगरपालिका आयुक्त बंगल्यातील साहित्याची चौकशी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:35 PM2020-11-07T23:35:24+5:302020-11-07T23:36:55+5:30
साहित्य गहाळ झाले असल्यास गुन्हा दाखल करावा
नवी मुंबई : महानगरपालिका आयुक्त निवासामधील साहित्य गहाळ झाल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. साहित्य गहाळ झाले असल्यास पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांसाठी नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर बंगला बांधण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या निवासस्थानामधून टीव्ही, फ्रीज, पडदे व इतर वस्तू चोरीला गेल्याची चर्चा सुरू आहे. प्रशासनाने तत्काळ बंगल्याची रंगरगोटी करून नवीन साहित्य खरेदी करून हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही बोलले जात आहे. आयुक्त निवासस्थानातील साहित्य गहाळ प्रकरणावरून उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी पत्राद्वारे केली आहे.
साहित्य चोरी किंवा गहाळ होणे ही गंभीर गोष्ट आहे. निवासस्थानामधील नक्की किती साहित्य गहाळ झाले आहे, याची माहिती घेऊन याविषयी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली असून, आता मनपा प्रशासन काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.