हवेच्या दर्जाचे मापन व परीक्षण करणारी मॉनिटरिंग स्टेशन्स बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 12:47 AM2020-11-06T00:47:21+5:302020-11-06T00:47:46+5:30
Panvel : तळोजा एमआयडीसी या पनवेल महापालिकेच्या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांद्वारे सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे.
पनवेल : टाळेबंदीचे नियम शिथिल होताच हवेच्या गुणवत्तेत कमालीची घसरण दिसून येत आहे. विशेषतः खारघर, तळोजा आणि पनवेल या पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवाशांना पुन्हा एकदा प्रदूषित हवेमुळे आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या भागात हवेच्या दर्जाचे मापन व परीक्षण करण्यासाठी एअर मॉनिटर्स बसविण्याची गरज असल्याने तशा आशयाचे पत्र वातावरण फाउंडेशनद्वारे पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना देण्यात आले आहे.
तळोजा एमआयडीसी या पनवेल महापालिकेच्या औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांद्वारे सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. उग्र वासाने आणि श्वास कोंडणारे विषारी वायू बाहेर पडत असल्याने या भागातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार महाराष्ट्रातील एकूण १८ शहरे ही हवेची गुणवत्ता गाठू न शकणारी शहरे आहेत.
या १८ शहरांपैकी नवी मुंबई हे राज्यातले सर्वाधिक प्रदूषित शहर असून ग्लोबल एअर व्हिज्युअल रिपोर्टनुसार नवी मुंबईचा वायुप्रदूषणाच्या बाबतीत जगात ५१ वा क्रमांक लागतो. देशभरातील कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्र हे राज्य हवा प्रदूषणाच्या बाबतीत अव्वल असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
खारघर, तळोजा फेज-१, फेज-२, नावडे, कळंबोली, कामोठे, रोडपाली या भागात हवेच्या दर्जाचे मापन व परीक्षण करणारी मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्याची गरज असल्याचे वातावरण फाउंडेशनचे अध्यक्ष भगवान केशभट यांनी सांगितले. स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
- कोविड-१९ आणि हवा प्रदूषण यांच्यात परस्परसंबंध दर्शविणारा आंतरराष्ट्रीय अभ्यास ‘भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने’ही स्वीकारला. त्यामुळे हवा प्रदूषणामुळे नवी मुंबईतील जनतेचे होणारे हाल याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे असल्याचे मत वातावरण फाउंडेशनचे सदस्य राहुल सावंत यांनी व्यक्त केले.