कलिंगड, खरबुजाला मागणी वाढली
By Admin | Published: May 7, 2017 06:23 AM2017-05-07T06:23:51+5:302017-05-07T06:23:51+5:30
वाढत्या उन्हाचा दाह कमी करणारे कलिंगड आणि खरबूज यांची मागणी वाढत आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार
- प्राची सोनवणे -
नवी मुंबई : वाढत्या उन्हाचा दाह कमी करणारे कलिंगड आणि खरबूज यांची मागणी वाढत आहे. वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत कर्नाटक, मध्यप्रदेशातून कलिंगडांची आवक केली जात आहे. तर महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून खरबुजांची आवक होत आहे. शनिवारी ५४८५ क्विंटल कलिंगडांची आवक झाली, तर १२४० खरबुजांची आवक झाली. फेबु्रवारी ते मे या कालावधीत कलिंगडांचा हंगाम पाहायला मिळतो. कर्नाटक, मध्यप्रदेशातील कलिंगडाच्या आवकेचा हंगाम संपत आला असून, आता नगर, सोलापूर, शिरूर अशा महाराष्ट्रातील विविध भागांतून कलिंगडांची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारपेठते १० ते १८ रुपये किलो दराने कलिंगड उपलब्ध आहे, तर १२ ते १४ रुपये किलोने खरबुजाची विक्री केली जात आहे. ‘मधुबाला’ किंवा ‘नामधारी’ ही परराज्यातील, तर स्थानिक भागातील ‘आॅगस्टा’, ‘शुगरबेबी’ जातीच्या कलिंगडांना ग्राहकांची पसंती असते. परराज्यातील कलिंगड लाल मातीत उत्पादित केली जातात. चवीला गोड, आकार मोठा, टिकण्यास चांगली यामुळे या कलिंगडांना ग्राहकांकडून जास्त मागणी असते.
तुलनेत स्थानिक परिसरातील कलिंगडांना कमी मागणी असल्याचे पाहायला मिळते. हातगाडीवर कलिंगड विकणारे, फ्रूट डीशविक्रे ते यांच्याप्रमाणे घरगुती ग्राहकांकडून मागणी वाढल्याचे त्यांनी नमूद केले. बॉबी, कुंदन, नामधारी अशा जातीच्या खरबुजांना अधिक मागणी
आहे.
किरकोळ बाजारपेठेत कलिंगड १५ ते २५ रुपये किलोने उपलब्ध आहे, तर खरबूज १४ ते २० रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे.
चायनीज कलिंगडाला मागणी
त्यातच चायनीज बीज वापरून लागवड केलेल्या चायनीय कलिंगडाला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. चायनीज कलिंगडामध्ये, ‘शुगर किंग’, ‘सागर किंग’, ‘किरण’, ‘ब्लॅक बॉय’ नावाची कलिंगड बाजारात दाखल झाली आहेत. ही कलिंगडे चवीला गोड आणि वजनाने जास्त भरतात. त्यामुळे ग्राहकांकडून चायनीज कलिंगडांची मागणी वाढतेय. मॉलमध्ये चायनीज कलिंगड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तसेच समप्रमाणात ग्लुकोजची मात्रा असल्याने शरीरात थंडावा निर्माण करते. या फळात पोटॅशिअमची मात्रादेखील जास्त असून, शरीरातील रक्ताची घनआम्लता समप्रमाणात ठेवण्यास मदत होते.